– डॉ. जाधव यांना थेट गडचिरोली दाखविल्याने झेडपी वर्तुळात खळबळ!
सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – सोलापूर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांचे राज्य सरकारने निलंबन केले होते. परंतु, त्यांना आता गडचिरोली येथे नियुक्ती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गडचिरोली आरोग्य विभाग येथील निवासस्थानमधून बाहेर न जाण्याबाबतचा आदेश उपसंचालक डॉ. राधाकृष्ण पोवार यांनी काढला आहे. डॉ. जाधव यांना थेट गडचिरोली दाखविल्याने जिल्हा परिषद वर्तुळात चांगलीच खळबळ उडालेली आहे.
आरोग्य अधिकारी डॉ. जाधव यांना निलंबित करण्याची कारवाई आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केली होती. या निलंबनाच्या कारवाईमुळे जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग हादरले होते. नवीन आरोग्य केंद्राचे परिपूर्ण प्रस्ताव सादर न करणे, जिल्ह्यातील २२ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ६८ उपकेंद्र यांच्या नवीन प्रस्तावाबाबत सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ सावंत ही निलंबनाची कारवाई केली होती.
दरम्यान, डॉ. जाधव यांना गडचिरोलीला निलंबन काळात नियुक्ती दिल्याने आता सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती होणार? असा प्रश्न पडला आहे. विशेष म्हणजे, आरोग्य अधिकारी जाधव यांच्या निलंबनानंतर निलंबनाची कारवाई कशी काय केली, असा प्रश्न जिल्ह्यातील सर्वांनाच पडला असला तरी, मागील काही दिवसापासून डॉ. जाधव यांच्याबाबत अनेक तक्रारी देण्यात आल्याचे समजत आहे.
ओव्हर कॉन्फिडन्सचा फटका!
डॉ. शीतलकुमार जाधव हे माध्यम प्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांचा कधीही फोन उचलत नव्हते. हे सर्वांना ज्ञात होते. शिवाय, डॉ. जाधव यांच्याबाबत जिल्हा परिषदेचे अनेक सदस्यांनी तक्रारी केल्या तरीही काही झाले नव्हते. अखेर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी कामातील हलगर्जीपणा पाहून निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असले तरी अनेकांनी केले ते योग्यच केले असाही सूर उमटत आहे.
—————-