सोलापूर (संदीप येरवडे) – जिल्हा परिषदेमधील सध्या सुरू असलेले पार्किंगचे काम बेकायदेशीर असून, कार्यारंभ आदेश देण्यापूर्वीच ५० टक्के काम झालेदेखील आहे. त्यामुळे मुख्यालयामध्येच असे काम होत असेल तर जिल्ह्याची परिस्थिती काय असेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी यांना गाड्या लावण्यासाठी चार ठिकाणी पार्किंगचे काम सुरू आहे. पूर्वीचे सिमेंटचे पत्रे काढून त्या ठिकाणी नव्याने स्क्वेअर अँगल बदलले जात आहे. आता केवळ पत्रे टाकायचे राहिले आहे. त्यामुळे जवळपास ५० ते ६० टक्के हे काम पूर्ण झाले आहे. मात्र या कामासाठी अद्याप कार्यारंभ आदेश देण्यात आला नाही. परंतु काम अर्धे पूर्ण झाले असेल तर तसे नियमात बसते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वास्तविक पाहता, कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी संबंधित ठेकेदाराला त्या कामाचे कार्यारंभ आदेश दिल्याशिवाय ते काम सुरू करता येत नाही. कामाच्या अंदाजपत्रकाला तांत्रिक मान्यता देणे गरजेचे आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया झाली पाहिजे. परंतु, जिल्हा परिषदेमधील काही मनमानी अधिकार्यांमुळे अशी बेकायदेशीर कामे सुरू होत असतील, तर ते कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वी देखील मुख्यालयामधील अनेक कामे कार्यारंभ आदेश देण्यापूर्वीच करण्यात आले असल्याचा आवाज निघत आहे. दरम्यान, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी अभियंता साय्यना चौगुले यांना विचारले असता त्यांनीदेखील अद्याप टेंडर प्रक्रिया झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
—————