सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे सध्या सुरू असलेल्या सोनांकुर एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या चुकीच्या पद्धतीने चालवल्या जात असलेल्या कत्तलखान्याची योग्य ती चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे केली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे २०१३ सालापासून अतिशय चुकीच्या पध्दतीने, परवाना नसताना कत्तलखाना चालवणे व अधिकार्यांना हाताशी धरून त्या ठिकाणी गोवंश व इतर जनावरांची हत्या केली जाते. तसेच यापूर्वी त्या ठिकाणी बांगलादेशी घुसखोरदेखील आढळलेले आहेत. चुकीच्या नियोजनाने व चुकीच्या पद्धतीने चालवले जात असल्याने त्या ठिकाणी तपासलेल्या पाण्याचे नमुनेदेखील अतिशय दूषित आढळले आहेत. याला ग्रामपंचायतीने परवानगी देखील दिलेली नाही. सदर कत्तलखाना बंद करण्यात यावा, असे दोन ग्रामपंचायतीने ठरावदेखील दिलेले आहेत. असे असतानाही अद्याप त्या ठिकाणी कत्तलखाना सुरू आहे. सदर कत्तलखाना सुरू करताना त्याच्या मालकाने हमीपत्र दिलेले होते, की या ठिकाणी सुरू असलेल्या कत्तलखान्यातून कोणत्याही प्रकारचा प्रदूषण होणार नाही. पण त्याचेही उल्लंघन या ठिकाणी झालेले आहे. त्याची योग्य ती चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आ. कल्याणशेट्टी यांनी केली.
दरम्यान, यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणशेट्टी यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे बरोबर असून, त्या ठिकाणी २०१७ साली दोन बांगलादेशी घुसखोर आढळलेले होते. त्यांच्यावर नंतर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कारवाई करून त्यांना बाहेर काढले होते. त्या ठिकाणी आजपर्यंत घडलेल्या ज्यात बांधकाम परवाना योग्य प्रकारे घेतला नाही, प्रदूषण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होते, तसेच गोवंश हत्या केली जाते. आदी पडत असलेल्या चुकीच्या गोष्टीची उच्चस्तरीय चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
——————-