सकाळी भाजपच्या ऑफरची चर्चा; दुपारी चंद्रकांतदादा हे सुशीलकुमार शिंदेंच्या भेटीला!
– चंद्रकांत पाटलांनी घेतली शिंदेंच्या निवासस्थानी जात भेट; ‘ऑफर’ची शक्यता नाकारली!
सोलापूर (हेमंत चौधरी) – सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीला दोनदा पराभव झाला, तरीदेखील मला आणि आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपमध्ये या म्हणून ‘ऑफर’ आल्याचा गौप्यस्फोट माजी केंद्रीय गृहमंत्री तथा माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. ’आता मी ८३ वर्षात आहे, अशावेळी दुसर्याचे घर कसे उभा करणार, म्हणत त्यांनी आपण पक्ष सोडणार नाही, असेही स्पष्ट केले. दरम्यान, आज भाजपचे मंत्री तथा वरिष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी शिंदे यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याने या भेटीचा राजकीय अर्थ लावला जात आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्या संपर्कात भाजपचे नेते असून, त्या आगामी लोकसभा निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवतील, अशी दाट शक्यता वर्तविली जात असताना, चंद्रकांतदादा व सुशीलकुमार शिंदे यांची भेट झाल्याने या शक्यतेला दुजोराच मिळत आहे.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री आहेत. ते आज सुशीलकुमार शिंदे यांच्या गौप्यस्फोटानंतर शिंदे यांच्या निवासस्थानी गेले. यावेळी दोन्ही नेत्यांची भेट झाली. सोलापूरमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या निमंत्रण देण्यासाठी दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती पक्षाच्या नेत्यांनी दिली. तरीदेखील आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. पुढील महिन्यात लोकसभेची निवडणूक असणार आहे. सुशीलकुमार शिंदे यांची सोलापुरात राजकीय ताकद आहे. त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे या स्वत: आमदार आहेत. त्यांना भाजप प्रवेशाची ऑफर असून, त्या अनुकूल असल्याचेही सांगितले जात आहे. काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता काँग्रेसचे दिग्गज नेते सुशील कुमार शिंदे हेदेखील काँग्रेस सोडणार का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. तथापि, चंद्रकांतदादा पाटील यांनी शिंदेंच्या भाजप प्रवेशाबाबत मोघम स्पष्टीकरण देत, आपली भेट राजकीय नसल्याचे स्पष्ट केले. चंद्रकांतदादा म्हणाले, की ‘सुशीलकुमार शिंदे हे स्वत: एक चांगले कलाकार आहेत. त्यांनी महाविद्यालयीन जीवनात अनेक नाटकांमध्ये भाग घेतला आहे. सुशीलकुमार हे ८८ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते. त्यामुळे आम्ही त्यांना नाट्यसंमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी आलो होतो की, तुम्ही २७ तारखेला उद्घाटनाला या. या व्यतिरिक्त कुठलाही राजकीय विषय नाही’, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे काही कुटुंब हे महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय सुसंस्कृत म्हणून प्रसिद्ध आहेत, ज्यांच्यावर कधीच कुणी शितोडे उडवले नाही, त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवून प्रणितीताई चालत आहेत. प्रणिती शिंदे या आक्रमक आहेत, पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी आक्रमक आहेत. अशी सुसंस्कृत फॅमिली, अशा सुसंस्कृत प्रणितीताई भाजप पक्षात आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करु. पण अशी कुठलीही ऑफर भाजपने दिली नाही किंवा तशी कुठलीही इच्छा त्यांनी व्यक्त केलेली नाही’, असेही चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.
सोलापुरातील एका हुर्डा पार्टीनिमित्त आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सुशीलकुमार शिंदे यांनी भाषण केले. त्यावेळी त्यांनी भाजपकडून आपल्याला व मुलगी प्रणिती शिंदेंना ऑफर आल्याचे स्पष्ट केले. ‘ज्या आईच्या कुशीत आमचे बालपण, तारूण्य गेले, अशावेळी आम्ही दुसरीकडे जाणे कसे शक्य आहे’, असा सवालही त्यांनी यावेळी केला. आमदार प्रणिती शिंदे तर कधीही पक्ष बदलण्याचा विचार करणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राजकारणात असे होत राहते, दिवंगत पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्याही बाबतीत असे झाले होते. पण, त्यांनी पक्ष सोडला नाही. सध्या पक्षाला थोडेसे वाईट दिवस आहेत, पण यातूनही पक्ष निश्चितपणे उभारी घेईल. थोडा त्रास होतो, पण त्यातही संघर्ष करून उभा राहिल्यास निश्चितपणे पुन्हा यश मिळते, असेही ते म्हणाले. सोलापुरातील गड्डा मैदानावर दिवगंत पंतप्रधान पंडीत नेहरूंनी भाषण केले होते, तेव्हा मी लहान होतो. त्यावेळी ते म्हणाले, ‘मुलगा जन्मल्यावर लहानपणी तो कोणाचा तरी आधार घेऊन चालण्याचा, उभारण्याचा प्रयत्न करतो. काही दिवसांनी तो स्वत: चालण्याचा किंवा उभारण्याचा प्रयत्न करतो आणि पडतो. पण, ज्यावेळी तो उभारतो त्यावेळी तो पुन्हा कधीच पडत नाही’. सध्या पक्षाला थोडे वाईट दिवस आहेत, पण कालांतराने पक्ष पुन्हा उभारी घेईल, असा विश्वासही शिंदे यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला.
————-