BuldanaBULDHANAHead linesMaharashtraVidharbha

विनापरवाना रेल्वेच्या हद्दीत आला तर कारवाई करू; लोहमार्ग पोलिसांचा तुपकरांना इशारा!

– अशा नोटिसींना भीक घालत नाही, आंदोलन होणार – तुपकरांनी रेल्वे पोलिसांना ठणकावले!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मिसाळवाडी (ता. चिखली) येथील जाहीर सभेतून १९ जानेवारीला मलकापूर रेल्वे स्थानकावर गुजरात, नवी दिल्ली व मुंबईकडे जाणार्‍या रेल्वेगाड्या रोको आंदोलनाची घोषणा केली होती. सोयाबीन, कापसाला भाववाढ, पीकविमा, पिकांची नुकसान भरपाई, दुष्काळी मदत आदींच्या मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाची दखल घेऊन लोहमार्ग पोलिस ठाणे शेगाव यांनी कलम १४९अन्वये तुपकरांना नोटीस बजावली असून, रेल्वेच्या हद्दीत आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. रेल्वेगाड्या रोखण्याचा प्रयत्न केल्यास, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. त्यावर, अशा नोटिसांची आपल्याला सवय झाली असून, या नोटिसांना भीक घालत नाही. आंदोलन होणारच असे तुपकरांनी लोहमार्ग पोलिसांना ठणकावले आहे. नोटिसा देणे, बेकायदेशीर अटक करणे, यापेक्षा सोयाबीन-कापसाला भाववाढ द्या, पीकविमा, नुकसान भरपाई द्या, दुष्काळी मदत देऊन शेतकर्‍यांना न्याय द्या, असे रविकांत तुपकर यांनी केंद्र सरकार व रेल्वे प्रशासनाला बजावले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीन-कापूस प्रश्नावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तीव्र लढा उभारला आहे. शेतकरीविरोधी सरकारच्या विरोधात तुपकर हे शेतकर्‍यांसह रस्त्यावर उतरून लढत आहेत. केंद्र व राज्य सरकारला वारंवार वेळ देऊनही ते सोयाबीन कापसाबद्दल बोलायला तयार नसल्याने तुपकर यांनी १९ जानेवारीला ‘रेल्वे रोको’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार तुपकरांच्या नेतृत्वात १९ जानेवारिला रेल रोको आंदोलन होणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन तुपकरांनी केले आहे. दरम्यान, रेल्वे रोको आंदोलन आणि येणारे लोकसभा या अनुषंगाने रविकांत तुपकर यांच्या ठीकठिकाणी होणार्‍या परिवर्तन मेळाव्यांना शेतकरी, शेतमजूर तरुण व सर्वसामान्य जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. खामगाव तालुक्यातील अटाळी व हिवरखेड येथे झालेल्या ‘एल्गार परिवर्तन’ मेळाव्यांना परिसरातील गावकर्‍यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.
चिखली तालुक्यातील मिसाळवाडी गावातून रेल्वे रोके आंदोलनाचे रणशिंग फुंकले गेले आहे. १३ जानेवारीरोजी शेतकरी, कष्टकरी, मजूर व तरुणांचा परिवर्तन एल्गार मेळावा मिसाळवाडीत मोठ्या उत्साहात पार पडला. पंचक्रोशीतील गावकर्‍यांनी या मेळाव्याला गर्दी केली होती. जेसीबीने पुष्पवृष्टी करून गावकर्‍यांनी तुपकरांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले, तर लोकसभा निवडणुकीसाठी गावकर्‍यांच्यावतीने १ लक्ष रुपये लोकवर्गणीचा धनादेश तुपकरांना दिला गेला. त्यानंतर खामगाव तालुक्यातील हिवरखेड व अटाळी परिसरातील गावकर्‍यांचा जोरदार व उत्स्फूर्त प्रतिसाद या परिवर्तन एल्गार मेळाव्याला मिळाला. परिसरातील तरुणांनी ताकदीने या मेळाव्यांचे नियोजन केले होते. शेतकरी व गावगाड्यातील सामान्य नागरिकांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. शेतमालाला भाव नाही, दुष्काळाची मदत नाही, पीकविमा नाही, नुकसान भरपाई नाही, फक्त घोषणांचा पाऊस अशी सरकारची अवस्था आहे. सध्याच्या सरकारच्या काळात शेतकर्‍यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तरीही, सरकार सत्तेच्या धुंदीत मस्त आहे. त्यामुळेच गावगाड्यातील सामान्य शेतकरी पेटून उठला आहे. येणार्‍या काळात सत्ताधारी नेत्यांच्या राजकीय वतनदारी उद्ध्वस्त केल्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा रविकांत तुपकरांनी यावेळी दिला. यावेळी रवी महानकार, जिल्हा संपर्कप्रमुख श्याम अवथळे, वैभव हटकर, श्रीकृष्ण काकडे, दिपक देशमुख, महादेव पवार, गजानन वानखेडे, नानाभाऊ खटके, बबन खोडके, मोहन खेडकर, निलेश गवळी, गोपाल सुरडकर, ज्ञानेश्वर दांदडे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


लोकसभेसाठी उभा राहतोय लोकनिधी…!

यावर्षी काहीही झाले तरी लोकसभा लढायची आणि जिंकायचीच असा निर्धार शेतकरी शेतमजूर व तरुणांनी केला आहे. त्यासाठी हे सर्वजण सर्व शक्तीनिशी शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या पाठीशी उभे राहत आहेत. गावागावातून लोकवर्गणी जमा होत आहे. दोन दिवसांपूर्वी मिसाळवाडी येथे ग्रामस्थांनी एक लाख रुपयांची लोकवर्गणी दिली तर काल खामगाव तालुक्यातील हिवरखेड व अटाळी येथे झालेल्या मेळाव्यादरम्यान रविकांत तुपकरांना येणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी वैभव हटकर यांनी ११ हजार रुपयांच्या लोकवर्गणीचा धनादेश सुपूर्द केला. तर सागर पांढरे यांनी ११ हजार रुपये व राजूभाऊ हटकर यांनी ५ हजार रुपये निधी लोकसभेसाठी देण्याची घोषणा केली. माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ग्रामस्थ दाखवत असलेला विश्वास माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन रविकांत तुपकरांनी याप्रसंगी केले.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!