ग्रामपंचायतीच्या कारभारात सरपंच, उपसरपंच, सदस्यांच्या नातेवाईकांना लुडबूड करण्यास सक्त मनाई!
चिखली (एकनाथ माळेकर) – ग्रामपंचायतीला ग्रामसंसद असे म्हटले जाते. परंतु, ग्रामपंचायतीच्या कारभारात सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचे नातेवाईक विनाकारण लुडबूड करतात. तसेच, महिला सरपंच किंवा सदस्य असेल तर त्यांचे पती किंवा मुलेच कारभारात हस्तक्षेप करतात. हे प्रकार सक्तीने टाळण्यासाठी राज्य सरकारने परिपत्रकच जारी केले आहे. अशा प्रकारे ग्रामपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप करण्यास शासनाने सक्तीने मनाई केली असून, नियमाचे उल्लंघन झाल्यास विभागीय आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले आहेत.
ग्रामपंचायतीच्या कारभारात लुडबूड करणार्या नातेवाईकांना ग्रामपंचायत कार्यालयात येण्यास सक्त मनाई करण्यात आली असल्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. सध्या अनेक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचे पती व मुलांचा हस्तक्षेप वाढल्याने, परिणामी गावाच्या विकासात एकसूत्रता निर्माण होत नसल्याने, गावाच्या प्रगतीत मोठी बाधा निर्माण होत आहे. अनेक ग्रामपंचायतीमध्ये पती व मुलेच कारभारात ढवळाढवळ करून ग्रामपंचायतीचे मालक बनू पाहत आहेत; मात्र आशा पती व मुलांनी ग्रामपंचायतीच्या कारभारात ढवळाढवळ करुन ग्रामपंचायत पदाधिकार्यांवर दबाव निर्माण केल्यास, तसेच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बसल्यास मोठी कायदेशीर कारवाईचे निर्देश शासनाने दिले आहेत.
याबाबतच्या जारी केलेल्या पत्रकात नमूद आहे, की शासन परिपत्रक क्रं. झेडपीए १००५/९४ /मुस / प्रक्र १०४/पंरा१/दि. १७ जुलै २००७ अन्वये पदाधिकार्यांनी त्यांची कामे स्वतः करणे गरजेचे आहे. त्यांचे निकट नातेवाईकांनी त्यांच्या कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप करु नये. विशेषत: त्यांनी पदाधिकार्यांच्या अर्थात ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मुळीच बसता कामा नये, असे निर्देश शासनाने दिलेले आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ३९ (१) अन्वये सरपंच / उपसरपंच / सदस्य यांना सदर गैरवर्तणुकीबद्दल कार्यवाही करण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना दिलेले आहेत, असे नमूद केलेले आहे. तरी सर्व संबंधित ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांनी सदरचे परिपत्रक सर्व सरपंच/ उपसरपंच / सदस्य यांचे निदर्शनास आणून देऊन उचित कार्यवाही करण्याचे आदेशदेखील शासनाने दिलेले आहेत.
—————-