Breaking newsBULDHANAHead linesNagpurVidharbha

सोयाबीन, कापूस दरवाढप्रश्नी राज्य, केंद्राने शब्द पाळावा; अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन!

– कापूस व सोयाबीन भाववाढप्रश्नी राज्य सरकारने शब्द देऊनही केंद्राशी चर्चा केली नाही!

– सोयाबीन-कापूस प्रश्नाबाबत रविकांत तुपकरांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट

– वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशीही केली चर्चा

… अन्यथा पुन्हा एकदा आक्रमक आंदोलनाचे हत्यार उपसू – रविकांत तुपकर

नागपूर (विशेष प्रतिनिधी) – सोयाबीन व कापसाच्या दरवाढीसाठी केंद्र सरकारने शब्द देऊनही अजूनपर्यंत काहीही हालचाल केली नाही. उत्पादन खर्चाइतकाही सद्या सोयाबीन व कापसाला भाव मिळत नाही. गेल्या आठवड्यात दीड हजाराने कापसाचे भाव उतरले आहेत व सोयाबीनदेखील साडेपाच हजाराच्या पुढे जायाला तयार नाही. राज्य व केंद्र सरकारने आपला शब्द पाळावा. याप्रश्नी राज्य सरकारने केंद्राशी चर्चा करावी, अन्यथा पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांना नागपुरात भेटून दिला आहे. सोयाबीन-कापसाच्या दरवाढीसाठी महाराष्ट्रभर आंदोलन करणारे फायरब्रँड शेतकरी नेते रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. तुपकरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री अब्दुल सत्तार व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नागपूर विधानभवनात भेट घेवून सोयाबीन-कापसाच्या प्रश्नावर लक्ष वेधले. सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल ५,५०० च्यावर जायला तयार नाहीत व कापसाचे दरही दीड हजारांनी घटले आहेत. याबाबत कालच ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे रविकांत तुपकर हे पुन्हा एकदा आक्रमक होण्याच्या तयारीत आहेत. 

सोयाबीन-कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्य आणि केंद्र शासनाकडे सातत्याने रेटा लाऊन धरला आहे. दरम्यान सोयाबीन-कापसाचे भाव स्थिर राहावे, यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाशी चर्चा व पत्रव्यवहार करुन हा प्रश्न गांभीर्याने मांडावा, यासाठी रविकांत तुपकर यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच कृषीमंत्री अब्दुल सत्तार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांचीदेखील भेट घेतली.
सोयाबीन-कापसाच्या दरवाढीसाठी आंदोलन करणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. यापूर्वी तुपकरांनी ६ नोव्हेंबरला बुलढाण्यात सोयाबीन-कापूस उत्पादकांचा विराट एल्गार मोर्चा काढला होता. त्यानंतर मुंबईतील अरबी समुद्रात जलसमाधी घेण्यासाठी तुपकरांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी मुंबईत धडकले होते. त्यावेळी राज्य सरकारने तुपकरांशी सह्याद्री अतिथी गृह येथे चर्चा केली व राज्य सरकार, केंद्र सरकारशी चर्चा करून मार्ग काढेल, असा शब्द दिला होता. राज्य सरकारने तुपकरांच्या राज्य सरकारशी संबंधीत काही मागण्या मान्य केल्या होत्या. परंतु राज्य सरकारने केंद्र सरकारशी चर्चा न केल्याने सोयाबीन-कापसाचे भाव सातत्याने चढउतार होत आहेत. दिल्लीत तुपकरांची केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल व कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांच्याशी चर्चा झाली होती. पण यासंदर्भात अजून कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे तुपकरांनी २९ डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सोयाबीन-कापसाच्या दरवाढीसाठी आयात -निर्यात धोरणात बदल करण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करून पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे. बहुतांश शेतकर्‍यांनी आपला कृषीमाल घरातच ठेवला आहे. सोयाबीन-कापूस विक्रीसाठी बाजारात नेण्याची सध्या शेतकर्‍यांची मानसिकता नसून त्यांना भाव वाढण्याची अपेक्षा आहे. आयात-निर्यातीच्या धोरणात बदल केल्याशिवाय सोयाबीन- कापसाचे दर वाढू शकत नाही. त्यामुळे कापसाचे आयातशुल्क पूर्वीप्रमाणे ११ टक्के ठेवावे, कापूस व सूत नियार्तीला प्रोत्साहन द्यावे, सोयापेंड (डीओसी) नियार्तीला प्रोत्साहन द्यावे, मागील वर्षी आयात केलेल्या ५ लाख मेट्रिक टन सोयापेंडला दिलेली मुदतवाढ रद्द करावी, सोयापेंड आयात करु नये, यंदा १५ लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करावी, सोयाबीनची वायदे बाजारावरील बंदी उठवावी, खाद्य तेलांवरील आयात शुल्क ३० टक्के करावे, सोयाबीनवरील पाच टक्के जीएसटी रद्द करावा, या मागण्यांबाबत राज्य शासनाने केंद्र सरकारशी चर्चा करून पत्र व्यवहार करावा. तसेच पाठपुरावा करावा, अशी मागणी तुपकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
यावेळी ना. फडणवीस यांनी केंद्राशी पत्रव्यवहार करण्यासह या मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. जर सरकारने यासंदर्भात लवकर हालचाली केल्या नाही तर मग मात्र आम्ही पुन्हा एकदा आक्रमक आंदोलनाचे हत्यार उपसू, असा इशारा रविकांत तुपकरांनी यावेळी दिला आहे. त्यानंतर तुपकरांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन जंगली जनावरांपासून शेतीला संरक्षण मिळण्यासाठी शेतीला कंपाउंड करण्याची योजना तात्काळ आणावी, अशी मागणी रेटून धरली. यासंदर्भात शेतीला कंपाउंड करण्याची योजना लवकरच आणण्याचा शब्द ना. मुनगंटीवार यांनी दिला. यावेळी ‘स्वाभिमानी’चे नागपूर जिल्हाध्यक्ष दयाल राऊत, बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुर्या अदबाळे,यवतमाळ जिल्हाध्यक्ष मनीष जाधव,संकेत दुरुगकर उपस्थित होते.


कृषीमंत्री सत्तारांनी दिले केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांना पत्र

रविकांत तुपकर यांनी सोयाबीन-कापूस प्रश्नाबाबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेवून त्यांना पत्र दिले होते. तुपकरांच्या या पत्रावरुन ना. सत्तार यांनी मागण्यांचे सविस्तर पत्र केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांना दिले आहे. शिवाय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनादेखील त्यांनी प्रत्यक्ष भेटून हे पत्र देऊन सोयाबीन-कापूस प्रश्नी त्यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. सोयाबीन-कापूस प्रश्नाबाबत आपण गंभीर असून, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरुच ठेवणार असल्याचे ना.सत्तार यांनी तुपकरांना सांगितले.


…तर आक्रमक आंदोलन

आंदोलन हाती घेतले तेव्हा सोयाबीनचे दर तीन ते साडेतीन हजार तर कापसाचे दर सात ते आठ हजार रूपये होते. आंदोलनानंतर सोयाबीनचे दर सहा हजारापर्यंत पोहोचले होते तर कापूस ९ हजारावर गेला होता. परंतु केंद्र सरकारने ठोस निर्णय न घेतल्याने भावात चढउतार होत आहे. सोयाबीन-कापूस प्रश्नाबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन यावर मार्ग काढण्याचा शब्द राज्य सरकारने दिला होता. परंतु अद्यापही याबाबत ठोस निर्णय झाला नाही. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा न केल्यास पुन्हा आक्रमक आंदोलन करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!