सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूर जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून ग्रामीण भागातील शेतकर्यांसाठी ५० टक्के अनुदानावर कृषी अवजारे खरेदीसाठी प्रस्ताव मागून घेतले जात आहे. परंतु, या कृषी योजनेसाठी शेतकर्यांचे प्रस्ताव येत नसल्यामुळे उदासीनता पाहायला मिळत आहे. प्रस्ताव सादर करण्यासाठी ३ जानेवारी अंतिम मुदत देण्यात आली आहे.
कृषी योजनेमध्ये ट्रॅक्टर चलीत अवजारे पेरणी यंत्र, रोटावेटर, पलटी नांगर, कल्टीवेटर साहित्य खरेदी करता येणार आहे. याबरोबरच थ्री पिस्टर पंप, बॅटरी स्प्रे पंप, ब्रश कटर, तुषार सिंचन, डिझेल इंजिन, कडबाकुट्टी, ताडपत्री, स्लरी फिल्टर, स्प्रे पंप, पाच एचपी व साडेसात एचपी मोटर आदी अवजारे देण्यात येणार आहेत. परंतु लाभार्थीच मिळत नसल्यामुळे योजना राबविणे कृषी विभागाला कठीण झाले आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी या कृषी योजना राबविली जाते. परंतु त्यावेळी अर्जाची संख्या अधिक आणि लाभार्थ्यांची संख्या कमी असल्यामुळे लाभार्थी निवडणे कसरतीचे काम होते. सध्या जिल्हा परिषद सदस्य नसल्यामुळे लाभार्थ्यापर्यंत झेडपीला पोचता येत नसल्याचे दिसत आहे. झेडपी सदस्य असल्यानंतर शिफारशीद्वारे आपल्या भागातील नागरिकांना कृषी योजना बाबत माहिती देऊन मंजुर यादीमध्ये नाव देत होते. परंतु आता प्रस्तावच शेतकर्याकडून येत नसल्यामुळे यंदा सेस फंडातून राबविण्यात येणारे कृषी योजनेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
जिल्हा परिषद कृषी विभाग यांच्याकडून ५० टक्के अनुदानावर कृषीपूरक योजना सुरू झाल्या आहेत. त्या योजनेचा शेतकर्यांनी लाभ घ्यावा. यासाठी ३ जानेवारी अंतिम मुदत देण्यात आली आहे. तरी तालुक्याला प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
—————-