सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्यास दिलेल्या नोटिसा मागे घेण्यात याव्यात, आणि गेल्या ३२ दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी सभासद व कामगारांच्या चक्री उपोषणाची शासन व प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी, यासाठी शेतकरी सभासद अनंतप्पा बुगडे (चपळगाव) आणि सिध्देश्वर राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे सरचिटणीस अशोक बिराजदार यांनी आपल्या रक्तांनी पत्र लिहून कारखान्याविरुध्दच्या सर्व नोटिसा मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता विकास मंच व चिमणी बचाव यांच्यामधील वाद पुन्हा चव्हाट्यावर येत असल्याचे दिसत आहे.
कारखाना बचावसाठी कारखान्याच्या कार्यस्थळावर गेल्या ३३ दिवसांपासून कामगारांचे तर शेतकर्यांचे ३२ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू आहे. बोरामणी येथे मंजूर असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरात लवकर सुरू करा, कारखान्याच्या चिमणीला धक्का न लावता होटगी रोड विमानतळाच्या १५ नंबर धावपट्टीवरून शहराच्या दिशेने विमानसेवा सुरू करा, कारखान्यास दिलेल्या सर्व नोटिसा प्रशासनाने मागे घ्याव्यात, यासह अन्य मागण्यांसाठी कारखान्याचे शेतकरी सभासद व कामगारांनी सोलापूर-विजयपूर, सोलापूर-हैदराबाद, सोलापूर-अक्कलकोट या महामार्गांवर रास्ता रोको आंदोलन केले होते. १९ डिसेंबर रोजी कारखान्यापासून होम मैदानापर्यंत विराट मोर्चाही काढण्यात आला होता. त्यामध्ये शेतकरी सभासद व त्यांचे कुटुंबीय, कारखान्याचे कामगार, त्यांचे कुटुंबीय, कारखान्याचे हितचिंतक आदी सुमारे २५ हजारांपेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते. शेतकरी व कामगारांची कामधेनू असलेल्या सिध्देश्वर कारखान्याला संरक्षण देण्याबाबत शासनाने लवकर निर्णय घ्यावा यासाठी शेतकरी सभासद अनंतप्पा बुगडे व साखर कामगार युनियनचे सरचिटणीस अशोक बिराजदार यांनी स्वत:च्या रक्ताने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून कामगार आणि शेतकरी सभासदांच्या संतप्त भावना मांडल्या आहेत.
सिध्देश्वर कारखान्यावर कामगारांचे १५ हजार आणि २८ हजार सभासदांचे कुटुंबीय तसेच ऊसतोड कामगार, ऊस वाहतूक चालक-मालक यांच्याशिवाय प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सुमारे तीन लाखांपेक्षा अधिक लोकांची उपजीविका अवलंबून आहे. कारखान्याच्या चिमणीला धक्का न लावता बोरामणी येथील विमानतळ लवकरात लवकर सुरू करा. या नव्या विमानतळामुळे सोलापूरच्या विकासाला आणखी गती मिळेल. केवळ शेतकरी सभासद व कामगारांचे जीवन उद्ध्वस्त करण्यासाठीच जर कारखान्याच्या चिमणीला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला तर शेतकरी सभासद व कामगार आत्मदहन करतील, असे बुगडे व बिराजदार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
——————