सोलापूर (संदीप येरवडे) – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेतील आता कोणत्या अधिकार्याचा नंबर लागणार? अशी चर्चा रंगली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांच्यावर अनपेक्षित कारवाई झाल्याने झेडपीतील अधिकारी व कर्मचार्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर काहीजण श्रेय वादात अडकले आहेत. बर्याच जणांनी आपल्या तक्रारीमुळेच त्यांच्यावर कारवाई झाली, असा दावा केला आहे. त्याचबरोबर आता कोणत्या अधिकार्याचा नंबर लागणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
झेडपीच्या सर्वसाधारण सभेत समाज कल्याण विभागाच्या दलितवस्ती विकास योजनेच्या कामाबाबत आक्षेप घेण्यात आला होता. याबाबत समाजकल्याण आयुक्तांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यावरून समाजकल्याणचे सहायक आयुक्त मनीषा फुले यांनी चौकशी केली होती. अद्याप या चौकशीचा अहवाल बाहेर आलेला नाही. डीपीसीच्या बैठकीत जलजीवनच्या कामाच्या टेंडरबाबत ओरड झाली होती. आमदार सुभाष देशमुख व इतर आमदारांच्या मागणीवरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकार्यांनी चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी, समाजकल्याण अधिकारी खमितकर हे नागपूरला रवाना झाले आहेत. आता हे दोन्ही विषय सभागृहात चर्चेला येणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
माध्यमिक शिक्षण विभाग रडारवर…
माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर हे प्रदीर्घ रजेवर गेले आहेत. त्यांचा पदभार सुलभा वठारे यांच्याकडे देण्यात आलेला आहे. माध्यमिक शिक्षण विभागातील लिपिकाविरोधात लोकशासन आंदोलन पार्टीचे कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत. झेडपी प्रशासनाने आंदोलन करताना नोटीस दिलेली आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
अनेक विभागप्रमुखांनी घेतला धसका
झेडपीचे आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केल्यानंतर आता अनेक विभाग प्रमुखाने याचा धसका घेतला आहे. त्यामुळे आता कारवाईच्या रडारवर कोण असणार अशी चर्चा सध्या रंगत आहे.
—————-