कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या अवैध खडी क्रशरकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत कर्जतचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले व तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निलंबित करण्यात आले आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधिमंडळात ही माहिती दिली. याप्रश्नी आ. राम शिंदे यांनी लक्ष्यवेधी सूचना मांडली होती.
कर्जत तालुक्यातील गौण खनिजसंदर्भात आ. राम शिंदे यांनी नागपूर अधिवेशनात कर्जत तालुक्यातील अनधिकृत खाण आणि स्टोन क्रशर प्रकरणी लक्षवेधी मांडली होती. या प्रकरणात ४८ कोटी रूपये दंडही आकारला होता. मात्र त्याबाबत आ. प्रा राम शिंदे हे समाधानी नव्हते. त्यांनी याबाबत पुन्हा लक्ष वेधण्याचे संकेत दिले होते. या प्रकरणात आज नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे व प्रांत अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांना निलंबित केले असून, विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करत, या समितीने एक महिन्यात अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत. या निलंबनामुळे कर्जत व जामखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कर्जत तालुक्यात अनेक बेकायदेशीर खडी क्रेशर आहेत. याबाबत तक्रारी करुनही त्याची दखल घेण्यात आली नव्हती. चौकशीत प्रांताधिकारी व तहसीलदार दोषी आढळल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून, गेली काही वर्षात कर्जत, जामखेड मतदारसंघातील राजकारणात अधिकार्यांची वागणूक ही काही अंशी कारणीभूत असल्याची चर्चा होत आहे.
—————