शेतकरी आहे हैरान, सत्तार खातो गायरान!; विधिमंडळाच्या पायर्यांवर विरोधकांचे टाळांच्या गजरात आंदोलन
नागपूर (विशेष राजकीय प्रतिनिधी) – डोक्यावर टोपी, हातात टाळ आणि ‘शेतकरी आहे हैरान, सत्तार खातो गायरान’, ‘खोके घ्या कुणी खोके घ्या’, ‘सत्तार बोला कुणी गद्दार बोला’, ‘सुरतेला चला कुणी गुवाहाटीला चला’, अशा घोषणा देत, आणि टाळांच्या गजरात महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज सकाळीच विधिमंडळाच्या पायर्यांवर अनोखे आंदोलन करत, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या गायरान जमीन वाटप घोटाळ्याकडे सरकार व प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले. मंत्री सत्तार यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीसाठी विरोधकांनी आजही विधिमंडळाच्या पायर्यांपासून सभागृह दणाणून सोडले.
विधानसभेच्या पायर्यांवर विरोधक एकत्र येत, दिडशे कोटींची गायरान जमीन लाटण्याचा आरोप असलेल्या मंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा मागत, बॅनर झळकावले. यावेळी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, अंबादास दानवे, आदित्य ठाकरे, धनंजय मुंडे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे आमदार चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले.
बेळगाव, निपाणी, बिदरसह ८६५ गावं महाराष्ट्राचीच; कर्नाटकविरोधात सीमावादाचा ठराव एकमताने मंजूर
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून विरोधक आक्रमक झाल्यानंतर अखेर शिंदे-फडणवीस सरकारने विधानसभेत मांडलेला ठराव एकमताने मंजूर झाला आहे. कर्नाटकातील मराठी भाषिक 865 गावांची इंच अन् इंच जागा महाराष्ट्राची असून सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठिशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभे असल्याचा ठरावा आज विधानसभेत मांडण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभेत ठरावाचं वाचन करण्यात आलं. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा ठराव तत्काळ मंजूर केला. सीमावादाचा हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला असून महाराष्ट्रातील एक इंचही जमीन कर्नाटकात जाणार नाही, असं या ठरावात मांडण्यात आलं आहे. “सर्वांनी एकमताने ठराव मंजूर केला, याबद्दल मी सर्व विधानसभेतील सदस्यांचे आभार मानतो”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी सीमाभागातील जाहीर करण्यात आलेल्या योजनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी या मराठी या शहरांसह 865 गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्या संदर्भातील ठराव एक मताने विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे.