– निरंजन गायकवाड पाटील यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड
नागपूर (विशेष राजकीय प्रतिनिधी) – राज्यातील पोलिस पाटलांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या नेतृत्वात नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावरील मोर्चाला राज्य सरकारने सकारात्मकतेने घेतले असून, पोलिस पाटलांच्या रिक्त जागा भरण्यासह सर्व मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेले आहे. तसेच, याप्रश्नी लवकरच मुंबईत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून सविस्तर चर्चादेखील करण्याचे राज्य सरकारने निश्चित केले आहे. त्यामुळे पोलिस पाटलांच्या मागण्या मार्गी लागण्याची आशा या मोर्चाने निर्माण झालेली आहे.
सविस्तर असे, की राज्यात २८ हजार पोलीस पाटील कार्यरत असून, राज्यात रिक्त पदेसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. राज्यातील पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी २२ डिसेंबररोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखालील भूतो न भविष्यती असा भव्य मोर्चा काढण्यात आला, या मोर्चात राज्यातील वीस हजार पोलीस पाटील सहभागी झाले होते. या मोर्चाची सुरुवात सकाळी ११ वाजता यशवंत स्टेडियम येथून होऊन, झिरो माईल या ठिकाणी संध्याकाळी ५.३० वाजता मोर्चा समाप्त झाला. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील अनेक आमदारांनी हजेरी लावून पोलीस पाटलांना संबोधित केले, या वेळी काही आमदारांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वाराच्या जवळ पोलीस पाटलांच्या मागण्यांचे फलक हातात घेऊन, घोषणाबाजी करत निदर्शने केली, तर काही आमदारांनी पोलीस पाटील प्रश्न लाऊन धरला. यावेळी सर्व पक्षाच्या आमदारांनी मोर्चाला उपस्थिती दर्शविली. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आ. मंगेश चव्हाण, आ. विश्वजीत कदम, आ.श्वेताताई महाले, आ.राजेश एकडे, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आ.अनिल बाबर, आ.अनिल चव्हाण, आ.राजेश राठोड, आ. इंद्रनिल नाईक या आमदारांसह ६७ आमदारांनी भेट देऊन गावं कामगार संघाच्या मोर्चाला समर्थन दिले. तसेच पोलीस पाटील यांच्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करण्याचे अभिवचन देऊन भव्य मोर्चाला संबोधित केले.
याप्रसंगी सरकारकडून चर्चेसाठी शिष्टमंडळाला बोलावण्यात आले. या शिष्टमंडळामध्ये पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, परशुरामकर पाटील, साळुंखे पाटील, मागले पाटील, राजकुमार यादव पाटील, चिंतामण मोरे पाटील यांचा समावेश होता. सरकारकडून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चर्चा केली. चर्चेदरम्यान विखे पाटील यांनी तात्काळ राज्यातील रिक्त पोलीस पाटील पदे भरण्याचे आदेश दिले, तसेच पोलीस पाटलांच्या उर्वरित मागण्यांसाठी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपली मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित केली जाईल व त्या बैठकीत आपल्या मागण्या बाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
या मोर्चासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील महासंघ राज्य उपाध्यक्ष गणवीर पाटील आणि महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील कल्याणकारी संघटना अमरावती अध्यक्ष प्रफुल गुल्हाने यांनीदेखील पाठिंबा दिला होता. तसेच महाराष्ट्र राज्य गाव पोलीस पाटील कामगार संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनी यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस पाटील निरंजन गायकवाड पाटील यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड करून विदर्भाला संघात मानाचे पद दिले. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी नागपूर विभागीय अध्यक्ष विजय घाडगे, नागपूर जिल्हा अध्यक्ष रितेश दुरुगकर यांच्यासह सर्व विभागीय अध्यक्ष आणि सर्व जिल्हा अध्यक्ष यांनी परिश्रम घेतले. या मोर्चा साठी बुलडाणा जिल्हा अध्यक्ष राजेंद्र भामद्रे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातून सहाशे पोलीस पाटील उपस्थित होते.
पोलिस पाटलांनी २२ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य गावं कामगार संघावर विश्वास ठेऊन खूप मोठ्या संख्येने नागपूरला येऊन भव्य असा मोर्चा यशस्वी केला. मोर्चा यशस्वी झाला म्हणून आम्ही गप्प बसणार नाही, तर जोपर्यंत पोलीस पाटलाच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहिल, मागण्या मंजूर होईपर्यंत शासन दरबारी निरंतर प्रयत्न चालुच राहतील. सामान्य पोलीस पाटलांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य गावं कामगार पोलीस पाटील संघ कटीबद्ध आहे.
– बाळासाहेब शिंदे पाटील, राज्य अध्यक्ष
बुलडाणा जिल्हा गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या विनंतीला मान देऊन, मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश एकडे आणि चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी मोर्चाला भेट देऊन, मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करण्याचे अभिवचन दिले. तसेच संघाच्या विनंतीवरुन खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार आकाशदादा फुंडकर यांनी सभागृहात पोलीस पाटील यांच्या मागण्यांबाबत प्रश्न मांडला. या तिनही आमदार महोदयांच्या पाठपुराव्यामुळे आमचे प्रश्न मार्गी लागतील अस्ाा ठाम विश्वास आहे. तसेच आमच्यावर विश्वास ठेऊन जिल्ह्यातील ६०० पोलीस पाटील बंधु भगिनीं नागपूर मोर्चाला उपस्थित राहीले त्यांचे सुद्धा मनस्वी आभार.
– राजेंद्र भामद्रे, जिल्हा अध्यक्ष, बुलढाणा