Head linesSOLAPUR

‘समाज कल्याण’मधील शिपाई अ‍ॅण्टीकरप्शनच्या जाळ्यात!

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयातील भ्रष्टाचार मागील अनेक दिवसांपासून चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, एका शिक्षिकेचा प्रलंबित पगार काढण्यासाठी पाच लाखाची मागणी करणार्‍या एका शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. यामध्ये सहभागी असलेला दुसरा शिपाई मात्र पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले. शिपाई पाच लाख कसे मागू शकतो, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, यामागे मोठा अधिकारी असावा, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

अशोक जाधव बसवनगर मंद्रुप येथे शिपाई असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तर टेभुर्णी येथील जय तुळजाभवानी माध्यमिक आश्रमशाळा येथील किसन भोसले-पाटील हा शिपाई पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले. यातील तक्रारदार यांची पत्नी समाज कल्याणच्या एका आश्रम शाळेत शिक्षिका आहे. त्यांचा प्रलंबित पगार काढण्यासाठी तब्बल पाच लाखाची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली.

दरम्यान, पैसे मागितल्याची खात्री झाल्यानंतर अ‍ॅण्टी करप्शन विभागाने अशोक जाधव याला पकडले. पोलिसांनी जाधव याला पकडल्याची माहिती होताच किसन भोसले पाटील हा पळून जाण्यात यशस्वी झाला. विशेष म्हणजे, पोलिसांनी पकडलेला आरोपी अशोक जाधव हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता सहाय्यक आयुक्तांचीही चौकशी होण्याची शक्यता समाज कल्याण विभागात वर्तवली जात आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून जिल्हा परिषदेमध्ये अ‍ॅण्टी करप्शन विभागाच्या जाळ्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी अडकत असताना आता सामाजिक न्याय विभागातदेखील अ‍ॅण्टी करप्शनची धाड पडल्याने कर्मचार्‍यांनी चांगलाच धसका घेतला असल्याचे दिसत आहे.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!