अब्दुल सत्तारांचा कोट्यवधींचा घोटाळा; तातडीने राजीनामा घ्या!
– शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून सत्तारांची बेताल वक्तव्ये, हा निर्लज्जपणाचा कळस – अजितदादांनी फटकारले
– सत्तारांच्या सिल्लोड महोत्सवासाठी १५ कोटी गोळा करणे, गायरान जमीन घोटाळ्यावरून विरोधक आक्रमक
नागपूर (विशेष राजकीय प्रतिनिधी) – एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून सातत्याने मंत्री अब्दुल सत्तार वादग्रस्ते वक्तव्ये करताहेत. कधी महिला खासदाराबद्दल (सुप्रिया सुळे) गरळ ओकतात तर कधी जिल्हाधिकार्यांना दारु पिता का? प्रश्न विचारतात. हा निर्लज्जपणाचा कळस आहे कळस…’, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा समाचार घेतला. भेदक नजर आणि आग ओकणारी भाषा पाहाता, आज अनेकांना अजितदादांच्या रौद्रावताराचा चांगलाच धसका बसला होता. सिल्लोडमधल्या कृषी कार्यक्रमावरुन बोलताना अजित पवार विधानसभेत कमालीचे आक्रमक झाले होते. त्यांच्या भाषणानंतर विधानसभेत विरोधकांनी मंत्री अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली.
राज्याच्या हिवाळी अधिवेशानाचा दुसरा आठवडा सुरू झालेला आहे. अधिवेशनातील दुसर्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सभागृहात सरकार आणि विरोधक यांच्यात जोरदार खटके उडाले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना धारेवर धरले. हे सरकार आल्यापासून कृषिमंत्र्यांचे बेताल वक्तव्य वाढले आहे. मुख्यमंत्र्यांच्या ओसडीएलाही त्यांनी शिवराळ भाषा वापरली, याशिवाय महिलांबद्दल बेताल वक्तव्याचे त्यांचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्वतः राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सत्तार यांचा राजीमाना घ्यावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातील गायरानासाठी आरक्षित असलेल्या ३७ एकर जमीन नियमित करण्याच्या आदेशावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सत्तार यांना नोटीस पाठवली आहे. तर सिल्लोड महोत्सवाला आर्थिक मदत करण्यासाठी राज्यभरातून १५ कोटी रुपये गोळा करण्याचे आदेश सत्तार यांनी एका बैठकीत दिल्याने खळबळ उडाली आहे. कृषी मंत्रालयाकडून कृषी विभागाच्या अधिकार्यांना १५ कोटी रूपयांचे टार्गेट दिले असल्याची माहिती समोर आल्यानंतर विरोधी पक्षांनी विधानसभेमध्ये हे प्रकरण उचलून धरत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्तार यांचे अक्षरशः वाभाडे काढले. त्यांनी या प्रकरणात थेट मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सत्तार हे मागील सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी वाशीम जिल्ह्यातील ३७ एकर सरकारी जमीन वाटप करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने ताशेरे ओढले असतांनाही भूखंड वाटप केल्याचा आरोप आहे. सत्तेचा दुरुपयोग करून एका व्यक्तीला भूखंड वाटप केल्याचा प्रकार जनहित याचिकेत उघड झाला आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा, असे पवार म्हणाले. सत्तार यांच्या कारभारावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. गायरान जमिनीचा १५० कोटींचा हा घोटाळा आहे. गायरान जमीन कुणाला देता येत नाही. सरकारी जमीन हडपण्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. महसूल राज्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय अवैध असल्याचे जिल्हाधिकार्यांना कळविले होते. वाशिमला लागून असलेली ३७ एकर जमीन आहे. पदाचा दुरूपयोग करत एका व्यक्तीला फायदा मिळून दिला आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला जावा, अशी मागणी करत असताना अजित पवार कमालीचे आक्रमक झाले होते.
अजित पवार यांचा आक्रमकपणा पाहून समोर बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यावर अजित पवार यांनी एकही शब्द ऐकून न घेता आपला मोर्चा फडणवीसांकडे वळवला. ‘देवेंद्र फडणवीस आपल्याकडून महाराष्ट्राला वेगळ्या अपेक्षा आहेत. अशा मंत्र्यांना पाठिशी घालणे बरोबर नाही. मंत्र्यांच्या अशा वागण्याला खरे तर तुम्हीही तितकेच जबाबदार आहात. कारण असे वादग्रस्त मंत्री तुमच्या सरकारमध्ये सामिल आहेत..’, अशा शब्दात अजित पवार यांनी फडणवीसांनादेखील सुनावले.
कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र सीमाभाग केंद्रशासित करा – उद्धव ठाकरे
दरम्यान आज माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाला हजेरी लावली. त्यांनी यावेळी बोलताना जोरदार फटकेबाजी करत सीमावादाच्या मुद्द्यावर विरोधकांना कोंडीत पकडे. सीमावर्ती भागात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे अत्याचार सुरू आहेत. तेथील एखाद्या ग्रामपंचायतीने जर महाराष्ट्रात येण्याचा ठराव संमत केला की त्यांच्यावर थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. तसेच ती ग्रामपंचायतदेखील बरखास्त केली जात आहे. देशात मोगलाई आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. सीमावादावरून ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच सुनावले. नुसती बडबड नको. जर ठराव मांडणार असाल तर सीमाभाग केंद्राने ताब्यात घ्यावा. असाच ठराव असला पाहिजे, आजच्या आज ठराव करा, आणि केंद्राकडे पाठवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. बेळगावच्या महापालिकेने महाराष्ट्रात जाण्यासाठी ठराव पास केला त्यानंतर ती महापालिका कर्नाटकने बरखास्त केली. निदान इथे ग्रामपंचयत तरी बरखास्त करणार आहात का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
अब्दुल सत्तार यांचे काय आहे नेमके प्रकरण?
१ ते १० जानेवारीदरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे सिल्लोड महोत्सवाचे आयोजन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. त्यांच्या या कार्यक्रमासाठी कृषी आयुक्तांनी राज्यातील कृषी विभागाच्या अधिकार्यांना पैसे गोळा करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती एका कृषी संचालकाने दिली आहे. तर या कार्यक्रमासाठी छापण्यात आलेले कूपन विकण्याची जबाबदारी या अधिकार्यांवर आल्यामुळे अनेक अधिकारी तणावाखाली आले आहेत.
—————-