Uncategorized

नगर ते आष्टी डेमू रेल्वे धावली

बीड (जिल्हा प्रतिनिधी) – बीड व नगर जिल्हावासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरलेल्या अहमदनगर-बीड-परळी या रेल्वे मार्गावर अहमदनगर ते आष्टी अशी ‘डेमू रेल्वे’ सेवा आजपासून सुरु झाली. या रेल्वे मार्गाचा उद्घाटन समारंभ आज आष्टी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ऑनलाइन पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे, खा. डॉ. सुजय विखे-पाटील, आमदार सर्वश्री सुरेश धस, राम शिंदे, लक्ष्मण पवार उपस्थित होते. या नवीन आष्टी-नगर ब्रॉडगेज लाईन मराठवाड्याच्या विकासाचा नवा मार्ग ठरणार असून, नगर आणि बीड जिल्हे जोडले गेले आहेत. शेतकरी, स्थानिक व्यापार, उद्योग यांच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. हा रेल्वेमार्ग व्हावा, यासाठी स्व. गोपीनाथ मुंढे यांनी जीवाचे रान केले होते, अखेर त्यांचे स्वप्न पूर्ण झाले.

अहमदनगर-परळी रेल्वे मार्गाची एकूण लांबी २६१ किलोमीटर आहे. मागील महिन्यांमध्ये या रेल्वे मार्गावरील चाचणी पूर्ण झाली होती. त्यामुळे प्रवासी रेल्वे कधी सुरू होणार याकडे बीडवासीयांचे लक्ष लागले होते. त्यानंतर आज बीडवासीयांचे स्वप्न अखेर पूण झाले आहे. २६१ किमी अंतराच्या या एकूण प्रकल्पापैकी अहमदनगर ते आष्टी या ६७ किमी अंतरावर आजपासून डेमो रेल्वे धावण्यास सुरुवात झाली. याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवत केला.

आष्टी-अहमदनगर रेल्वे मार्गामुळे व्यापारी वर्गाला मुंबई, पुणे, दिल्ली, इंदोर, गुजरात, सुरत इत्यादी ठिकाणाहून माल आणण्यास या रेल्वे गाडीचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. यामुळे उद्योगधंद्याला चालना मिळून रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे. तसेच आष्टीच्या आसपासच्या पाथर्डी, जामखेड, कर्जत, पाटोदा, शिरूर, बीड इत्यादी तालुक्यातील नागरिकांना पुणे, मुंबई आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी या रेल्वेचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आष्टी-नगर ही ६६ किमी ब्रॉडगेज लाईन नगर-बीड-परळी वैजनाथ या २६१ किमी ब्रॉडगेज लाईन प्रकल्पाचा एक भाग आहे. या संपूर्ण प्रकल्पात केंद्र आणि राज्य सरकार यांचा ५०-५० टक्के खर्चाचा वाटा आहे. नगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारने २००० कोटी रुपये निधी दिले आणि राज्य सरकारकडून १४०० कोटी रुपये देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!