भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया : कर्णधार रोहितच्या दमदार खेळीने दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताचा 6 विकेट्सने विजय
नागपूर (क्रीडा प्रतिनिधी) : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी 20 क्रिकेट सामन्यात भारतीय संघाने 6 विकेट्सने विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली आहे. सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाबाद 46 धावांची दमदार खेळी करत विजयाच मोलाचा वाटा उचलला. तसच दिनेश कार्तिक याने दोन चेंडूत 10 धावा करत भारताचा विजय पक्का केला. पावसामुळे 8 षटकांच्या झालेल्या सामन्यातप्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 91 धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे भारताने 4 गडी गमावत 7.2 षटकात पूर्ण करत सामना 6 विकेट्सने जिंकला आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी20 सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानावर 23 सप्टेंबर रोजी हा सामना सायंकाळी 7 वाजता सुरु होणार होता. परंतू पावसाच्या व्यत्ययामुळे सामना उशीराने म्हणजेच 9.30 वाजता सुरु झाला. ज्यामुळे दोन्ही संघाना प्रत्येकी 8 ओव्हर्स खेळण्याची संधी देण्यात आली. ज्यानंतर भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खास झाली नाही, भारताचा अष्टपैलू क्रिकेटर अक्षर पटेलने उत्कृष्ट गोलंदाजी करत सुरुवातीपासून ऑस्ट्रेलियन फलंदाजांना तंबूत धाडण्यास सुरुवात केली. अक्षरने सामन्यात महत्त्वपूर्ण असे दोन विकेट घेतले. तर बुमराहने ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचला 31 धावांवर तंबूत धाडलं. ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडने 20 चेंडूत नाबाद 43 धावा केल्याने ऑस्ट्रेलियाने धावसंख्या 90 पर्यंत नेली. ज्यामुळे भारताला विजयासाठी 91 धावा 8 षटकात कराव्या लागणार होत्या.
आठ षटकात 91 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताने हे लक्ष्य सहज पूर्ण केलं. भारताच्या विकेट्स पडल्या पण कर्णधार रोहित शर्माने सुरुवातीपासून टिकून राहत दमदार फटकेबाजी सुरुच ठेवली. त्याने 20 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकार मारत नाबाद 46 धावा केल्या. तसंच स्टार फलंदाज दिनेश कार्तिक याने शेवटच्या ओव्हरच्या दोन चेंडूत 10 धावा करत भारताचा विजय पक्का केला. ज्यामुळे भारताने 6 आणि 4 चेंडू राखून सामना जिंकला. आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 25 टी-20 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 14 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, ऑस्ट्रेलियाच्या संघाला 10 सामने जिंकता आले आहेत. यातील एक सामना अनिर्णित ठरलाय.