कर्जत (प्रतिनिधी):-खाजगी दूध संकलन केंद्रापेक्षा सहकारी दूध संघ चांगला भाव देत असून सहकार महर्षी रावसाहेब ऊर्फ बाळासाहेब पाटील यांच्या मुळे तालुक्यातील ही एकमेव सहकारी संस्था जिवंत राहिली असल्याचे मत दूध संघाचेचेअरमन शंकरराव देशमुख यांनी व्यक्त केले.
सहकार महर्षी रावसाहेब ऊर्फ बाळासाहेब पाटील सहकारी दुध व्यावसायीक व प्रक्रिया संघाची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन शंकरराव देशमुख यांचे अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात दुध संघाच्या सभागृहात पार पडली. यावेळी शामराव काळे, बाळासाहेब निंबाळकर, दादासाहेब खराडे, रामजी पाटील, मंगेश जगताप, अंकुश दळवी, अशोक शिंदे, दत्तात्रय तनपुरे, नवनाथ खेडकर, जनार्दन मोढळे, रावसाहेब खराडे व तुकाराम सागडे, अर्जुन जंजीरे. ज्ञानदेव गांगर्डे, दादासाहेब कानगुडे यांच्यासह आजी, माजी संचालक व सभासद उपस्थित होते.
संघाचे अध्यक्ष देशमुख हे बोलताना म्हणाले की, संघ ८ वर्षापासून बंद झालेनंतर स्वर्गीय रावसाहेब ऊर्फ बाळासाहेब पाटील यांनी तो मोठ्या जिददीने व कष्टाने पुन्हा सुरु केला. यामध्ये सर्व संचालक व सभासदांनी मोलाचे योगदान दिल्याने आज अतिशय चांगल्या पध्दतीने दुध संघ काम करीत आहे. कर्जत तालुक्यात सहकार चळवळ जवळपास संपुष्टात आली होती. सहकार महर्षी रावसाहेब ऊर्फ बाळासाहेब पाटील यांच्यामुळेच आज तालुका सहकारी दुध संघ एकमेव सहकारी संस्था कार्यरत आहे. दुध व्यवसायामध्ये खाजगी संस्थांचे तालुक्यात मोठया प्रमाणात जाळे निर्माण झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये आपला दुध संघ खाजगी प्रकल्पाच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या दुधाला अतिशय चांगला भाव देत आहे व दुधाचे नियमित वेळेत पेमेंट करीत आहे. संघाचे जास्तीत जास्त दुध संकलन वाढवून तालुक्यामध्ये पुन्हा एकदा अग्रेसर राहण्यासाठी सर्वजण प्रयत्न करु पुढील काळात संघाच्या माध्यमातून नवीन दुध प्रकल्प उभारला जाईल. तसेच आपल्या दुध संघास सर्वात जास्त दूध पुरवठा करणाऱ्या, उच्च गुण प्रतीचे व निर्मळ दूध पुरवठा करणाऱ्या दुध संस्था व दुधकेंद्र यांना प्रोत्साहनपर बक्षीस योजना राबविण्यात येईल असे देशमुख म्हणाले. यावेळी सभासदांसह संचालकांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तावीक संचालक दादासाहेब खराडे यांनी केले व आभार रावसाहेब खराडे यांनी मानले. दूध संघाची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.