पैठण (तालुका प्रतिनिधी) – घारेगाव ता. औरंगाबाद येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकासह शिक्षक सतत दांडी मारत असून, शाळेत उशिरापर्यंत येत असल्यामुळे गावकर्यांनी गुरुवार (दि.२२)शाळेत जाऊन पाहणी केली असता, तिथे शाळेतील काही शिक्षकांनी व मुख्याध्यापक यांनी चक्क शाळेला एक महिन्यापासून दांडी मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले होते. याबाबत ब्रेकिंग महाराष्ट्रनेदेखील वृत्त प्रसारित करून याप्रश्नी लक्ष वेधले होते. त्यामुळे शिक्षण विभाग खडबडून जागे झाला. आज पोलिसांची मध्यस्थी व शिक्षण विस्तार अधिकारी यांनी दिलेले लेखी आश्वासन यामुळे ग्रामस्थांनी ठोकलेले कुलूप काढण्यात आले.
शिक्षण विस्तार अधिकारी रमेश ठाकूर यांनी शुक्रवारी सकाळी घारेगाव येथील शाळेला भेट दिली. त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या समजून घेतल्या व दोषीवर चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन पालकांना दिले. सोबत ग्रामस्थ यांना समजावून सांगत करमाड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे, सुनील लहाने (पोलीस नाईक), अजीज शेख (पोलीस नाईक ) यांनी मध्यस्थी करून विस्तार अधिकारी रमेश ठाकूर यांनी सर्व पालक व ग्रामस्थ यांना लेखी आश्वसन द्यावे असे सांगितले व शाळेचे कुलूप उघडण्यात आले. याप्रसंगी सरपंच विक्रम कतारे, उपसरपंच श्रीराम तांबे, अनिल काजळे, ग्रामपंचायत सदस्य विजय लहाने, शालेय समिती अध्यक्ष बळीराम लहाने, गणेश डायगव्हाणे, गणेश लहाने, सोमनाथ गव्हाणे, राजू ठोबरे, मदन गव्हाणे, रामेश्वर कतारे, संजय गलधर, विश्वास दाभाडे, शिवाजी कतारे आदिसह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.