मंत्री धनंजय मुंडे यांच्यापत्नी राजश्रीताईंच्या गाडीला भीषण अपघात; सुदैवाने बचावल्या!
- पुणे-सोलापूर महामार्गावरील भल्यापहाटेची भीषण दुर्घटना - भरधाव लॅण्ड क्रूझर कार ट्रॅव्हल्स बसला पाठीमागून घडकली
सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – राज्याचे कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्रीताई मुंडे यांच्या लॅण्ड क्रूझर कारला पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी फाट्याजवळ आज भल्यापहाटे भीषण अपघात झाला. या अपघातातून राजश्रीताई या सुदैवाने बचावल्या आहेत. त्यांची भरधाव असलेली कार समोरच्या ट्रॅव्हल्स बसवर पाठीमागून जाऊन धडकली. परंतु, लॅण्ड क्रूझर या अतिशय मजबूत अशा गाडीमुळे त्या सुदैवाने बचावल्या असून, एका खासगी कारने त्या पुण्याकडे निघून गेल्या होत्या. रस्त्यावरील अतिक्रमणामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सविस्तर असे, की राजश्रीताई धनंजय मुंडे या आपल्या लॅण्ड क्रूझर कारने पुण्याच्या दिशेने जात होत्या. पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी फाट्याजवळील घुले पेट्रोल पंपासमोरुन जाणार्या ट्रव्हल्स बस गाडीचा अंदाज न आल्याने मुंडे यांची भरधाव असलेली गाडी बसला पाठीमागून धडकली. धडक इतकी जोरदार होती की, लॅण्ड क्रूझर गाडी महामार्ग सोडून रस्त्याच्या बाहेर फेकली गेली. सुदैवाने गाडी पलटी न झाल्याने राजश्रीताई मुंडे व त्यांचा चालक सुखरूप बचावले. त्यानंतर मुंडे या खासगी वाहनाने पुण्याच्या दिशेने निघून गेल्या. या अपघातात त्यांना किरकोळ मार वगळता इतर काही दुखापत झालेली नाही, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे व इतरांनी तातडीने त्यांना फोन करून माहिती घेतली व त्यांची विचारपूस केली.
पुणे-सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले असून, त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. तसेच, या महामार्गावर बेकायदेशीरपणे वाहने उभी केल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. या गंभीर बाबीकडे मात्र महामार्ग प्राधिकरणाचा कानाडोळा असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
—————–