विधानसभेसाठी जिल्ह्यात २१.२४ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क
- मतदार नोंदणीसाठी २९ ऑक्टोंबरपर्यंत संधी; जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
– आचारसंहिता लागू; २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी
– जिल्ह्यात २ हजार २८८ मतदान केंद्र, २१ लाख २४ हजार मतदार
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील २ हजार २८८ मतदान केंद्रांवर दि. २० नोव्हेंबरला मतदान तर दि. २३ नोव्हेंबररोजी मतमोजणी होणार आहे. सुमारे २१ लाख २४ हजार २२७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुवासिनी गोणेवार आदी उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाचे ७० टक्क्यांवर मतदानाचे लक्ष्य आहे. केवळ प्रशासनाने मानस व्यक्त करून हा संकल्प साध्य होणार नसून, मतदारांनीही प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाधिक संख्येने मतदान करावे. तसेच ज्या मतदारांचे नाव मतदान यादीत नाही, अशा मतदारांनी २९ ऑक्टोंबरपर्यंत मतदान केंद्रावर किंवा ऑनलाईन नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पाटील यांनी यावेळी केले.
– निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे
जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ असून, या मतदारसंघातील निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे. मंगळवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करण्यात येईल. मंगळवार, दि. २९ ऑक्टोबर हा नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक असणार आहे. बुधवार दि. ३० ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे. सोमवार दि. ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान तर शनिवार दि. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया २५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
– जिल्ह्यात २१ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार
दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनंतर निरंतर पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत १५ ऑक्टोंबर रोजी जिल्ह्यातील मतदारांची संख्या २१ लक्ष २४ हजार २२७ असून यामध्ये पुरुष मतदार ११ लक्ष ०५ हजार १९३, महिला मतदार १० लक्ष १८ हजार ९९६ तर तृतीयपंथी मतदार ३८ आहे. विधानसभा मतदार संघनिहाय मतदारांची संख्या याप्रमाणे : २१-मलकापूर विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार १ लक्ष ४९ हजार ६८३, महिला मतदार १ लक्ष ३७ हजार ७५६ तर तृतीयपंथी ६ असे एकूण २ लक्ष ८७ हजार ४४५ मतदार आहेत. २२- बुलढाणा विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार १ लक्ष ५८ हजार ७८७, महिला मतदार १ लक्ष ४६ हजार ८८२ तर तृतीयपंथी १६ असे एकूण ३ लक्ष ५ हजार ६८५ मतदार आहेत. २३- चिखली विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार १ लक्ष ५६ हजार ०८३, महिला मतदार १ लक्ष ४७ हजार ३०५ तर तृतीयपंथी २ असे एकूण ३ लक्ष ०३ हजार ३९० मतदार आहेत. २४-सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार १ लक्ष ६७ हजार ७१५, महिला मतदार १ लक्ष ५३ हजार ३९९ तर तृतीयपंथी १ असे एकूण ३ लक्ष २१ हजार ११५ मतदार आहेत. २५-मेहकर विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार १ लक्ष ५९ हजार ०२३, महिला मतदार १ लक्ष ४६ हजार ०२६ तर तृतीयपंथी ४ असे एकूण ३ लक्ष ०५ हजार ०५३ मतदार आहेत. २६- खामगांव विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार १ लक्ष ५५ हजार ०६३, महिला मतदार १ लक्ष ४१ हजार ५३७ तर तृतीयपंथी ५ असे एकूण २ लक्ष ९६ हजार ६०५ मतदार आहेत. तर २७-जळगाव जामोद विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार १ लक्ष ५८ हजार ८३९, महिला मतदार १ लक्ष ४६ हजार ०९१ तर तृतीयपंथी ४ असे एकूण ३ लक्ष ०४ हजार ९३४ मतदार आहेत.
जिल्ह्यात २ हजार २२८ मतदान केंद्र
जिल्ह्यात लोकसभेसाठी २२६६ मतदान केंद्र होती.यात २३ नवीन मतदान केंद्रांची वाढ होऊन विधानसभा निवडणूक २०२४ साठी जिल्ह्यामध्ये २२८८ मतदान केंद्र आहे. यामध्ये मलकापूर येथे ३०५, बुलढाणा येथे ३३७, चिखली ३१७, सिंदखेड राजा ३४०, मेहकर ३५०, खामगांव ३२२ तर जळगाव जामोद येथे ३१७ असे एकूण २२८ मतदान केंद्र आहे. राज्य सीमेवर विशेष दक्षता : राज्य सीमेवरील चेकपोस्टवर विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. यासाठी राज्य सीमेवर दोन पोस्ट असणार असून राज्य उत्पादन शुल्क, परिवहन, वन तसेच पोलीस विभागांच्या पथकांमार्फत चेक पोस्टवर विशेष दक्षता घेण्यात येणार आहे.
सोशल मीडियावर राहणार विशेष लक्ष
सोशल मीडिया, फेक न्यूजवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. मतदानाच्या काळात सोशल मीडियावर प्रसारित होणारे, गैरसमज पसरविणारे संदेश व इतर घटनांवर लक्ष ठेवून अशा घटनांचे त्वरित खंडण करण्याची व कारवाई करण्याची खबरदारी घेणार असल्याचे सांगितले. व्होटर हेल्पलाईन अॅपवर मतदारांना आपले नाव शोधता येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून मतदारांनी मतदानासाठी आपले नाव शोधून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. नागरिकांना मतदार यादीतील नाव शोधण्याबाबत माहिती देऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी यावेळी म्हणाले. दिव्यांग व ८५ पेक्षा जास्त वयोमानातील मतदारांना निवडणूकीमध्ये मतदान करता यावे, यासाठी भारत निवडणूक आयोगाने होम वोटिंगची सुविधा देण्यात आली आहे. त्यानुसार त्यांना घरपोच मतदान करणे सोईचे होण्यासाठी व योग्य सोई सुविधा उपलब्ध करुन देणेसाठी सर्व समावेशक सूचना विधानसभास्तरावर देण्यात आलेल्या आहेत.
आचारसंहिता लागू झाल्यामुळे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सार्वजनिक ठिकाण जसे रेल्वे स्टेशन, बसस्टँड, रेल्वेपुल, रस्ते, शासकीय बसेस, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इमारती यावर असलेले राजकीय पक्षाचे व जाहिरात स्वरुपाचे पोस्टर, बॅनर, होर्डिंग, झेंडे ४८ तासांच्या आत काढून टाकण्याच्या सूचना निर्गमित केल्याचे त्यांनी सांगितले. आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी फ्लाईंग स्कॉड (भरारी पथक), एफएसटी, व्हीडीओ टीम, दारु, रोकड, प्रतिबंधित औषधे यांची सखोल तपासणी, राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत अवैध, नशीले पदार्थाच्या वाहतुकीसंदर्भात भरारी पथक तात्काळ कार्यान्वित करण्यात आले आहेत. जिल्ह्यात २१ नाके तयार करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. मतदारांच्या सुविधेसाठी जिल्ह्यात मतदार सहायता केंद्राची स्थापना करण्यात आली असून, १९५० या टोल प्रâी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकार्यांनी यावेळी केले.