कोलवड व शेलसुरातील शैक्षणिक कार्यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेच्या अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यकारी समितीवर कोलवड येथील विद्या विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील नामदेवराव जवंजाळ यांची अशासकीय सदस्य (बोर्ड मेंबर) पदी नियुक्ती शासनाने केली आहे. तर नागपूर विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यकारी समितीवर शिक्षण क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी असणारे शिवाजी विद्यालय, शेलसुर येथील प्रा. सुनील प्रतापराव सपकाळ यांची अशासकीय सदस्य (बोर्ड मेंबर) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या या दोन भूमिपुत्रांची शिक्षण मंडळाच्या कार्यकारी समितीवर वर्णी लागल्याने शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सुनील नामदेवराव जवंजाळ हे गेल्या ३३ वर्षापासून मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून, शैक्षणिक क्षेत्रामध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग त्यांनी केले आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात ते अग्रेसर असून, त्यांच्या या भरीव कामगिरीबद्दल त्यांना या अगोदर महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. तसेच, पर्यावरण संवर्धनासाठीचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार, त्याचबरोबर पर्यावरण या विषयासाठी राज्य अभ्यास मंडळ सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. आपत्ती व्यवस्थापन तद्न् मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे.
त्यांच्या कुशल नेतृत्वात कोलवड येथील विद्या विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयालादेखील विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अमरावती विभाग स्तर पुरस्कार, हरित शाळा पुरस्कार, लोकराज्य शाळा पुरस्कार, राज्य वनश्री पुरस्कार, उत्कृष्ट रोपवाटिका पुरस्कार, सीड बँक पुरस्कार आदी पुरस्कारांचा समावेश आहे. सुनील जवंजाळ व प्रा. सुनील सपकाळ यांचे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज’चे संपादकीय संचालक तथा स्वराज्य शिक्षक संघ बुलडाणा जिल्हा अध्यक्ष, मुख्याध्यापक संघाचे देऊळगावराजा तालुकाध्यक्ष शिवश्री प्रवीण मिसाळ यांच्यासह जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.