सेल्समननेच रचला दरोड्याचा बनाव; अवघ्या चार तासांत आरोपी जेरबंद!
- सुलतानपूर रोडवरील एस. एस. पेट्रोलपंपावरील दरोडा प्रकरण
बिबी (ऋषी दंदाले) – बिबी ते सुलतानपूर रोडवरील एस एस पेट्रोलपंपावर चाकूच्या धाकावर दरोडा घालून ७१ हजार ५५० रूपये लंपास करणार्या चोरट्याच्या बिबी पोलिसांनी अवघ्या चार तासांत मुसक्या आवळल्या. विशेष म्हणजे, फिर्यादी असलेला सेल्समनच या कटाचा सूत्रधार असल्याचे उघडकीस आले असून, त्याने व आरोपीने जबरी चोरीचा बनाव रचल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.
सविस्तर असे, की आज (दि.१६) रोजी पोलीस स्टेशन बिबी हद्दीत बिबी ते सुलतानपूर रोडवरील इंडियन ऑइल (ए.एस.) पेट्रोल पंपावर रात्री १ वाजून ३५ मिनिटाच्या सुमारास अज्ञात चोरट्याने पेट्रोल पंपावरील सेल्समनला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील ७१ हजार ५५० रूपये जबरदस्तीने चोरून नेले होते. याबाबत पोलीस स्टेशन बिबी येथे भारतीय न्यायसंहिता व शस्त्र अधिनियमनाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेची माहिती प्राप्त होताच, पोलीस स्टेशन बिबीचे ठाणेदार संदीप पाटील व पोलीस अंमलदार यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, तसेच पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अशोक लांडे यांना माहिती देऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले व पूर्णपणे ओळख लपवून आलेल्या चोरट्याचा कसोशीने शोध घेऊन आरोपी बाळू उर्फ विश्वनाथ परसराम तेजनकर (वय ३०) रा. वल्लूर ता. लोणार यास ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याच्या माहितीनुसार, आरोपीने पेट्रोल पंपावरील सेल्समन असलेल्या फिर्यादीसोबत संगनमत करून पेट्रोल पंपावरील पैसे चोरी करण्यासाठी जबरी चोरीचा बनाव रचला होता. आरोपी बाळू तेजनकर याच्याकडून गुन्ह्यातील गेलेला माल ७१ हजार ५५० रूपये, गुन्ह्यात वापरलेले हत्यार, वापरलेली दुचाकी (स्कुटी), तसेच घटनेवेळी ओळख लपविण्यासाठी वापरलेले कपडे, असा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही घटना घडल्याच्या माहितीवरून घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी तात्काळ भेट दिली व बिबी पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकास मार्गदर्शन केले. ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संदीप पाटील, पोलीस अंमलदार परमेश्वर शिंदे, अरुण सानप, नितीन मापारी, यशवंत जैवळ, बद्री कायंदे, चालक अशोक अंभोरे, अरुण मोहिते, रवी बोरे, आकाश काळदाते यांनी केली होती. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अवघ्या चार तासांच गुन्ह्याचा उलगडा केल्याने पोलिस पथकाचे कौतुक होत आहे.
————-