भाजपला धक्का; महादेव जानकर ‘महायुती’तून बाहेर!
- जानकरांची ४० ते ५० जागांची मागणी 'महायुती'ने फेटाळल्याने जानकरांचा स्वबळाचा नारा
– राज्यातील २८८ जागांवर उमेदवार उभे करणार!
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – ऐन विधानसभा निवडणुकीत ‘महायुती’ला मोठा धक्का बसला असून, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांनी ‘महायुती’तून बाहेर पडत, स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. आपण २८८ जागा राज्यात लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. जानकर यांनी आपल्या पक्षासाठी ‘महायुती’कडे ४० ते ५० जागांची मागणी केली होती. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने जानकरांनी ‘महायुती’तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या कोट्यातून परभणी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. आता विधानसभेला त्यांनी ‘महायुती’ची साथ सोडल्याने याचा फटका ‘महायुती’ला सहन करावा लागू शकतो. धनगर समाजाचा महादेव जानकर यांना मोठा पाठिंबा आहे. त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाची सोलापूर, बारामती, परभणी, बीड, जालना यासारख्या मतदारसंघात मोठी ताकद आहे. धनगर समाजाची संख्या जास्त असलेल्या मतदारसंघात जानकरांच्या पक्षाला चांगला पाठिंबा आहे. त्यामुळे ही बाब ‘महायुती’साठी विशेष करून भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते.
‘महायुती’तून बाहेर पडल्यानंतर महादेव जानकर म्हणाले, की आपल्याशी महायुती किंवा महाविकास आघाडीने संपर्क साधला नसून, आपण आपल्या पक्षाच्या वाढीसाठी हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात २८८ जागा लढविण्यासाठी आपण तयारी करत आहोत. लोकसभेला महायुतीने आम्हाला एक जागा दिली होती; पण आमचा पक्ष मोठा झाला पाहिजे, आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, यासाठी आम्ही तयारी करत आहोत. राज्यातील २०० मतदारसंघामध्ये प्रत्येक जागेसाठी तीन-तीन अर्ज आले आहेत. आता फक्त ८८ जागा राहिल्या आहेत. काही ठिकाणी आम्ही विजयी होऊ, काही ठिकाणी दोन नंबरची मतं घेऊ. काही ठिकाणी १० हजारांपेक्षा जास्त मतं घेऊ, असे ते म्हणाले.
————–