कार्यकर्त्यांचा एकच आवाज, ‘रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी’!
- माझी पवार साहेब यांच्यासोबत बैठक झाली, दोन दिवसांत होणार निर्णय : माजी मंत्री आ. डॉ. राजेंद्र शिंगणे
– अजितदादांची साथ सोडण्याची आ. शिंगणेंची तयारी, ‘तुतारी’च हाती घेणार?
साखरखेर्डा/सिंदखेडराजा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची आणि पदाधिकारी यांची आज, दि.१६ ऑक्टोबररोजी महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत सर्वच कार्यकर्त्यांनी शरदचंद्र पवार साहेब यांच्या पाठीशी उभे राहण्याची इच्छा व्यक्त करीत, साहेब म्हणा ‘रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी’ असा एकच आवाज सभागृहात घुमला. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आ. डॉ. शिंगणे यांनी अजितदादा पवार यांची साथ सोडण्याचे संकेत देत, लवकरच हातात तुतारी घेऊन विधानसभेला सामोरे जाण्याचे संकेत दिले आहेत.
माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना पत्रकारांनी आजच्या बैठकीबाबत प्रश्न उपस्थित करुन आपण काय निर्णय घेतला, अशी विचारणा केली. यावर ते म्हणाले की, आमचे घराणे शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर विश्वास ठेवून काम करीत आले आहे. यापुढेही तोच समतेचा विचार सोबत ठेवून आपण चालणार आहोत. माझी आणि अजित पवार साहेब यांची एक महिन्यापासून भेट झाली नाही. परंतु, शरदचंद्र पवार साहेब आणि जयंत पाटील यांची भेट झाली आहे. मी महायुती सरकार सोबत बँकेला मदत मिळावी म्हणून गेलो होतो. सरकार जमा झालो नव्हतो. या मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी मला तुमची गरज आहे, असे मी कार्यकर्त्यांना आव्हान केले होते. त्यानुसार, निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढवावी, हा निर्णय घेण्यासाठी आजची बैठक आयोजित केली होती. आजच्या बैठकीत ९९ टक्के उपस्थितांनी शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविली पाहिजे, असे मत व्यक्त केले. त्यामुळे येत्या दोन दिवसात माझा मी निर्णय घेणार आहे.
तर आपल्या भाषणात डॉ. शिंगणे म्हणाले, की उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी जे निर्णय घेतले ते सर्वांसाठी समान न्याय देण्याची सक्षम भूमिका साकारणारे निर्णय होते. २०२२ ला शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. आम्ही विरोधी पक्षात होतो, त्यामुळे आमची कोणतीही कामे होत नव्हती. अखेर अजित पवार यांनी सरकार मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मी पाठींबा दिला. तो केवळ बँकेला मदत मिळावी म्हणून. त्यानंतर खर्याअर्थाने मतदारसंघाला विकास निधी मिळाला, असेही त्यांनी सांगितले. आज कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली असता सर्वच कार्यकर्त्यांनी एकमुखी आवाज काढीत ‘रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी’ असा गगणभेदी आवाजाने पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. नाझेर काझी, प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे कार्याध्यक्ष शंतनु बोंद्रे, प्रदेश सरचिटणीस डॉ. रामप्रसाद शेळके, माजी कृषी सभापती दिनकरराव देशमुख, माजी उपाध्यक्ष राम जाधव, सतिश काळे, सभापती अनिल तुपकर, शिवाजीराजे जाधव, जगनमामा सहाणे, माजी सभापती तेजराव देशमुख, डॉ. विकास मिसाळ, राजू ठोके, दत्तात्रय ठोसरे, अजीम नवाज राही, अनिल चेके, गजानन वायाळ, सीताराम चौधरी, सय्यद रफीक, सुनील जगताप, दाऊद कुरेशी, संतोष शिंगणे, सुधाकर शिंगणे, अरुण मखमले, विठ्ठल राठोड, विनायक राठोड, रियाज खान पठाण, कौसर अली, कमलाकर गवई यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.