चिखली (तालुका प्रतिनिधी) – हिंदुत्वाच्या मतांचे विभाजन होऊ नये व महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन व्हावे, याकरिता आपण भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार आ. श्वेताताई महाले यांना बिनशर्त पाठिंबा देत आहोत, असे हिंदूराष्ट्र सेनेचे बुलढाणा जिल्हाप्रमुख व चिखली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विजय पवार यांनी जाहीर केले. दि.१५ नोव्हेंबररोजी हॉटेल मीरा सेलिब्रेशन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली.
विजय पवार यांनी चिखली मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला होता व ते प्रचार कार्यास लागले होते. मात्र यादरम्यान भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्याला निर्देश दिल्यानुसार आपण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आ. श्वेताताई महाले यांना समर्थन देत असून, यापुढे त्यांचा प्रचार करणार असल्याचे पवार म्हणाले. दरम्यान, आज (दि.१५) सकाळी आ. श्वेताताई महाले यांच्या निवासस्थानी विजय पवार यांनी आपल्या सहकार्यांसह भेट घेऊन आपल्या समर्थनाचे पत्र श्वेताताई महाले यांना यांच्या सुपूर्द केले. त्यानंतर दुपारी हॉटेल मीरा सेलिब्रेशन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करून पत्रकारांसमोर आपली भूमिका विशद केली. यावेळी बोलताना पवार यांनी हिंदुत्वाची मते फुटु नये व जे स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले ते शतप्रतिशत भाजपाच्या रुपाने साकार व्हावे आणि ‘बटेंगे तो कटेंगे’ ही त्यांची प्रतिज्ञा लक्षात घेऊन मी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार श्वेताताई महाले यांना माझे समर्थन पत्र देत आहे, असे विजय पवार यांनी सांगितले. हिंदूराष्ट्र सेनेचे जिल्हा कोषाध्यक्ष राकेश चोपडा, रवी माळवदे यांच्यासह हिंदूराष्ट्र सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.