राज्याच्या राजकारणात ‘नागपूरचे’ पाऊल पुढे! बुलढाण्याचीही ‘मान’ उंचावली!
- काँग्रेसकडून खा.मुकूल वासनिक, अविनाश पांडे विधानसभेसाठी ज्येष्ठ राज्य समन्वयक!
– तीन माजी मुख्यमंत्री व दोन माजी उपमुख्यमंत्र्यांनाही लावले पक्षाने विधानसभेच्या कामाला!
बुलढाणा/मुंबई (बाळू वानखेडे) – राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसही आता मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाली असून, त्याचाच एक भाग म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून खा.मुकूल वासनिक व अविनाश पांडे यांची ज्येष्ठ राज्यसमन्वयक नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे नागपूरचा राज्याच्या राजकारणातील ‘दबदबा’ वाढल्याचे दिसत असून, खा. वासनिकांच्या निमित्ताने बुलढाण्याची मान उंचावली असल्याचे दिसून येत आहे. या खेरीज देशातील तीन मुख्य माजी मुख्यमंत्री व दोन माजी उपमुख्यमंत्र्यांची विभागनिहाय ज्येष्ठ समन्वयक म्हणूनदेखील आज (दि.१५) पक्षाकडून नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल आजच वाजला असून, एकाच टप्प्यात मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे. काही दिवसावर मतदान आले असल्याने सर्वच पक्षांनी ‘सीट’ शेअरिंग व उमेदवार निश्चित करण्यावर भर दिला आहे. अशातच काँग्रेसही जोरदार कामाला लागल्याचे दिसत असून, राज्यातील पक्षाचे उमेदवार ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी राज्यसभेचे खासदार तथा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकूल वासनिक व अविनाश पांडे यांची ज्येष्ठ राज्य समन्वयक म्हणून काँग्रेस पक्षाकडून नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, वासनिक हे नागपूरचे असल्याने राज्याच्या राजकारणात नागपूरचा दबदबा वाढल्याचे अधोरेखीत झाले आहे. मुकूल वासनिक यांच्या राजकीय कारकिर्दीला बुलढाण्यातच ‘आकार ‘आल्याने या जिल्ह्याची ‘मान’ या निमित्ताने उंचावली असल्याचे दिसून येत आहे, तर कार्यकर्तेही समाधान व्यक्त करत आहेत. याशिवाय, पक्षाकडून राज्यात विभागनिहाय जेष्ठ निरीक्षकदेखील नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये कोकण व मुंबई विभागासाठी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत व डॉ.जी.परमेश्वरा यांची नियुक्ती करण्यात आली. यासोबतच विदर्भासाठी अर्थात अमरावती व नागपूर विभागासाठी माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल व पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी, उमेश सिंघर, मराठवाडा विभागासाठी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, उत्तमकुमार रेड्डी, पश्चिम महाराष्ट्रासाठी टी. एस.शिंघदेव व एम. बी. पाटील तर उत्तर महाराष्ट्रासाठी डॉ. सय्यद नासीर हुसेन व श्रीमती अनुसया शेथाक्का यांची काँग्रेस पक्षाकडून अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे यांच्या संमतीने महासचिव के.सी. रेणुगोपाल यांनी नियुक्ती केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकूल वासनिक व अविनाश पांडे हे या निवडणुकीसाठी वरिष्ठ समन्वयक असतील, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जाहीर केले आहे.