देऊळगाव घुबेत आज एकत्र कुटुंबपद्धतीत जगणार्या ५१ कुटुंबांचा सन्मान सोहळा
- स्व.कमलआई घुबे यांच्या पुण्यस्मरणार्थ भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने आयोजन
– व्याख्यान व शिवकीर्तन सोहळाही पार पडणार!
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – अगदीच दुर्मिळ होत चाललेल्या एकत्र कुटुंब पद्धतीत जगणार्या तब्बल ५१ कुटुंबांचा सन्मान सोहळा मंगळवारी (दि.१६) देऊळगाव घुबे येथे रंगणार आहे. स्व. कमलआई घुबे यांच्या पुण्यस्मरणार्थ भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच, प्रसिद्ध कीर्तनकार हभप. डॉ. प्रवीण महाराज दुशींग यांचे शिवकीर्तन, सुप्रसिद्ध कवयित्री तथा लेखिका तथा मराठवाडा साहित्य परिषदेच्या संचालिका डॉ. संजीवनी तडेगावकर यांचे व्याख्यान, अशा भरगच्च कार्यक्रमांचेदेखील आयोजन करण्यात आलेले असून, येथील जानकीदेवी विद्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा पार पडणार आहे.
भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थापक संचालिका स्व.कमलआई शेणफडराव घुबे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेली एकत्र कुटुंब पद्धती काळानुसार विभक्त होत चालली आहे. मात्र आजही अनेक कुटुंबे गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात. एकत्रित कुटुंबाचे फायदे समाजासमोर यावेत, व नात्यांमधील दुरावा कमी व्हावा, या उद्देशाने अशा ५१ कुटुंबीयांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांना विशेष उपस्थिती सामाजिक कार्यकर्त्या शाहीनाताई पठाण यांची राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेणफडराव घुबे हे राहतील. याप्रसंगी आजही एकत्रित कुटुंबामध्ये राहणार्या ५१ कुटुंबप्रमुखांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीची नव्या पिढीला जाणीव होऊन कुटुंब विभक्त होण्याला लगाम लागेल. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा वाढीस लागून संकटकाळामध्ये एकरुपतेची भावना निर्माण होईल, अशी यामागे आयोजनाची भूमिका असल्याचे शेणफडराव घुबे यांनी सांगितले. परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन भारत शिक्षण प्रसारक मंडळ, तथा विठ्ठल पार्वती अर्बन व डीएसके कॉम्प्युटर्स, आणि विठ्ठल पार्वती फूड प्रोसेसिंग प्लांट्सच्यावतीने करण्यात आले आहे.
कोणता झेंडा घेऊ हाती?; आ. डॉ. राजेंद्र शिंगणेंचे बुधवारी ठरणार!