कोणता झेंडा घेऊ हाती?; आ. डॉ. राजेंद्र शिंगणेंचे बुधवारी ठरणार!
- सिंदखेडराजा येथे कार्यकर्ता मेळावा; कार्यकर्त्यांची मते जाणून घेणार!
– जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व समर्थक नेत्यांना मेळाव्याचे आमंत्रण
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा-देऊळगावराजा विधानसभा मतदारसंघात गेल्या महिनाभरात अनेक राजकीय हालचाली सुरु आहेत. त्यात आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांची भूमिका काय? याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. बुधवारी (दि. १६ ऑक्टोबर) मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून, त्या मेळाव्यात आपली पुढील राजकीय दिशा ते ठरविणार आहेत. या कार्यकर्ता मेळाव्यात डॉ.राजेंद्र शिंगणे नेमका कोणता झेंडा हाती घेतात, याकडे मतदार संघाचे लक्ष लागले आहे.
मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसंदर्भात अनेक तर्कवितर्क काढले जात होते. जसजशी निवडणूक जवळजवळ येत आहे, तसतसी ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ अशी अवस्था कार्यकर्त्यांची झाली आहे. मलकापूर पांग्रा येथील कार्यक्रमात डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले होते की, कार्यकर्ते सांगत आहेत, की तुम्ही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जा! खरंतर मी सिंदखेडराजा मतदारसंघात १९९५ साली अपक्ष म्हणून निवडून दिले. त्यासाठी पक्षांची काठी मला लागत नाही. परंतु, मतदारसंघाचा आणि जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर पक्षांचा झेंडा महत्त्वाचा असतो. प्रत्येक कार्यकर्त्याने मला सल्ला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामागे त्यांचा हेतू स्पष्ट होता. अखेर तुम्ही मला निवडून देणारे आहात, त्यामुळे तुम्ही दिलेल्या सल्ला किती महत्वाचा आहे, हे ही पाहावे लागेल. गेल्या दोन महिन्यांपासून अनेक गावात विकासकामांचे भूमिपूजन व झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना, राष्ट्रवादी काँग्रेस वगळता एकाही पक्षनेत्याला स्थान देण्यात आलेले नाही. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या विचारांचा प्रभाव असलेला मतदारसंघ असल्याने डॉ. राजेंद्र शिंगणे यांना हातात तुतारी घेतल्याशिवाय पर्याय नाही, असाही सूर उमटत आहे.
डॉ. राजेंद्र शिंगणे हाच आमचा पक्ष आणि हाच आमचा नेता अशी भूमिका या मतदारसंघात राहिली आहे. दि.१६ ऑक्टोबररोजी होणार्या मेळाव्यात डॉ. रामप्रसाद शेळके, रियाज खान पठाण, जिल्हाध्यक्ष अॅड.नाझेर काझी, जगनमामा सहाणे, डॉ. विकास मिसाळ, रामभाऊ जाधव, दिनकरराव देशमुख, संतोष चेके, शिवाजीराजे जाधव, तेजराव देशमुख, राजू ठोके, दत्तात्रय ठोसरे, अजीम नवाज राही, अनिल तुपकर, सुरेश तुपकर, पंडितराव खंडारे, नाथाभाऊ दराडे, सुनील जगताप, कमलाकर गवई, सय्यद रफीक, संतोष खांदेभराड, इरफान अली, विनायक राठोड, यासह सिंदखेडराजा, देऊळगावराजा, लोणार, चिखली मतदारसंघातील तालुका अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. जर डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी कार्यकर्त्यांची काय भूमिका राहिल! या बाबत ते मते जाणून घेणार आहेत, असे सांगण्यात येत आहे.
आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीत बसून शरद पवारांच्या पुण्यातल्या ‘१ मोदी बाग’ येथे भेटायला गेले होते. मात्र, माध्यमांचे त्यांच्याकडे लक्ष जात असताना त्यांनी एका फाईलीआड आपला चेहरा लपविला होता. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या गाडीत बसून शरद पवारांच्या भेटीला जाणारा नेता कोण आणि त्यांनी फाईलीच्याआड आपला चेहरा का दडविला होता?, याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू राहिली होती. अखेर ते राजेंद्र शिंगणे असल्याचे समोर आले. त्यामुळे आ. शिंगणे हे शरद पवार यांच्यासोबत जाणे निश्चित असल्याचे मानले जात आहे. शरद पवारांनी सिंदखेडराजा मतदारसंघात विकासकामांसाठी मोठे सहकार्य केल्याची आ. शिंगणे यांची भावना आहे. आपण त्यांच्याबरोबर जाण्याचे सूतोवाच ते अप्रत्यक्षरित्या करत आले आहेत. त्यानुसार ते पवारांना भेटायला गेले, पण माध्यमांच्या प्रतिनिधींना पाहून त्यांनी स्वतःहून फाईलीच्याआड चेहरा लपविल्याने त्यांची चर्चा जास्त झाली.