Head linesLONARMEHAKARVidharbha

सर्वसामान्य जनता परिवर्तन घडवणारच : डॉ. ऋतुजा चव्हाण

- गावभेटीदरम्यान डॉ. ऋतुजा चव्हाण यांना मिळतोय भरघोस पाठिंबा

– ‘पोरी तू आमदार हो, तूच या तालुक्यांचा विकास करशील’; शेतकरी मायबापांच्या डॉ. ऋतुजा चव्हाण यांना भरभरून आशीर्वाद!

डोणगाव (प्रतिनिधी) – आज राज्यात नेमकं काय चालले काही समजायला मेळ नाही. राजकीय घडामोडी पाहता, राजकारणाचा चिखल झाला आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये चालू असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे आता यांच्या राजकारणाला सर्वसामान्य जनता कंटाळलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आता बदल करायचा आहे. त्यामुळे मेहकर मतदारसंघात आता परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे. यासाठी सर्वांनी एकजुटीने सोबत चला, असे आवाहन मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघातील उमेदवार व शेतकरी नेत्या डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी गावभेटी दरम्यान जनतेशी संवाद साधताना केले. या गावभेटींना सर्वसामान्य जनतेचा मोठा प्रतिसाद त्यांना लाभत असून, विशेष महिलावर्ग त्यांनाच मतदान करण्याची भूमिका घेत आहे.

आज वाढत्या महागाईच्या समस्या मेहकर मतदारसंघातील नागरिकांना भेडसावत आहेत. सोबतच विविध समस्या पाहता, सर्वसामान्य जनतेपर्यंत विकासाची गंगोत्री मतदारसंघात पोहोचलीच नाही. विकासापासून दूर असलेल्या मेहकर मतदारसंघात केवळ विकासात्मक घोषणाचा पाऊसचं पडत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मनातच परिवर्तन घडविण्याची इच्छा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत मेहकर -लोणार मतदारसंघात सर्वसामान्य जनता परिवर्तन घडवणार आहे, असे डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी जनतेशी संवाद साधताना गावभेटीदरम्यान सांगितले.
निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतातील पिकाची होत असलेली नुकसान, त्यामुळे शेतकर्‍यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर, पीकविमा, वाढती महागाई, त्यात जीवनावश्यक वस्तुचे भाव गगणाला भिडलेले आहेत. पेट्रोल-डिजल, घरगुती गॅस, वीजदरवाढ सातत्याने वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झालेला आहे. त्यातच गावागावात आरोग्य सुविधा, पाण्याचा प्रश्न, स्वच्छता, रस्ता, घरकुल, अशा विविध समस्यांनी प्रत्येक नागरिक हताश झालेला आहे. तरीही सर्वसामान्य हिताशी या सत्ताधार्‍यांना काहीही सोयरसुतक नसल्याने, महागाईच्या चक्रात सर्वसामान्य नागरिक पिळून आणि पिचून निघत असल्यामुळे येणार्‍या आगामी विधानसभा निवडणुकीत मेहकर मतदारसंघात सर्वसामान्य जनता परिवर्तन घडवणार आहे, असे डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी शेतकरी बांधवासोबत संवाद व चर्चा करताना आपले मत व्यक्त केले आहे.


मेहकर व लोणार तालुक्यांत आतापर्यंत फक्त भावनिक राजकारण झाले, त्यामुळे या मतदारसंघाचा मोठा अनुशेष निर्माण झालेला आहे. यावेळी जनतेने कोणत्याही भावनिक प्रवाहात न येता, ऋतुजा चव्हाण यांच्यासारख्या उच्चशिक्षित व विकासाची तळमळ असलेल्या महिला नेतृत्वाला विधानसभेत पाठवले पाहिजेत, अशा भावना या भागातील शेतकरी व तरूण व्यक्त करत आहेत. जे पंधरा वर्षे आमदार होते, त्यांना साधे रस्तेही बनवता आले नाही. शेतकर्‍यांसाठी काहीही करता आले नाही, असा संतापही या गावभेटीत अनेक शेतकर्‍यांनी व्यक्त करत, ऋतुजा तू आमदार हो, आमचे तुला आशीर्वाद आहेत, अशा शब्दांत अनेक वयोवृद्ध शेतकरी मायबापांनी डॉ. ऋतुजा चव्हाण यांना आपले आशीर्वाद दिलेत.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!