BULDHANAChikhaliHead linesPolitical NewsPoliticsVidharbha

धृपतरावांच्या पक्षांतरामुळे भाजपचा सुंठीवाचून खोकला गेला का?

- काँग्रेसला फायदा काय होणार?; चिखली अन बुलढाण्यात राजकीय चर्चांना उधाण!

– सोयर्‍या- धायर्‍यांच्या राजकारणाचा चिखलीत आ. श्वेताताई महालेंना फायदा!

चिखली (तालुका प्रतिनिधी) – बुलढाण्याचे माजी आमदार, चिखली विधानसभा निवडणुकीत एकवेळ पराभूत झालेले आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहिलेले धृपतराव सावळे यांनी पुन्हा एकदा पक्षांतर करून काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकूल वासनिक यांची भेट घेतली तेव्हाच, ते काँग्रेसमध्ये परतणार असल्याचे वृत्त ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने दिले होते. दरम्यान, भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदावर राहिलेले धृपतराव सावळे हे काँग्रेसमध्ये परत गेल्याबद्दल भाजपने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून, सुंठी वाचून खोकला गेला, अशा चर्चा मात्र खासगीत बोलताना ऐकू येत आहेत. चिखली बाजार समिती निवडणुकीत धृपतरावांनी सोयरे-धायरे यांना फोन करून भाजपच्या उमेदवारांना मतदानाची गळ घातली होती, अशी चर्चा होती. परंतु, कोणतेही सोयरे त्यांच्या कामी आले नाही, व बाजार समिती महाआघाडीच्या ताब्यात गेली होती. त्यामुळे राजकीय विजनवासात प्रदीर्घकाळ राहिल्याने लोकविस्मृतीत गेलेले धृपतराव हे काँग्रेसमध्ये गेल्याने त्यांचा फार काही फायदा काँग्रेस होईल, अशी शक्यता कमी असल्याचेही राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.

बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारण सद्या तरूण नेत्यांनी हातात घेतले आहे. त्यात धृपतराव सावळे यांच्यासारख्या बुजुर्ग नेतृत्वाला आता फारसी काही ‘स्पेस’ राहिली नाही, असे दिसते आहे. रविकांत तुपकर, संजय गायकवाड, संजय रायमुलकर, संजय कुटे, हर्षवर्धन सपकाळ, जयश्री शेळके, श्वेता महाले, राहुल बोंद्रे, आकाश फुंडकर, गणेश मांटे अगदीच अलीकडच्या गायत्री शिंगणे, विनायक सरनाईक, सुनील कायंदे यांच्यासारख्या तरूण नेतृत्वाच्या हाती बुलढाणा जिल्ह्याची राजकीय कमान आली आहे. काय जो राजकीय संघर्ष व्हायचा तो आता या नेत्यांतच होणार आहे. अशा परिस्थितीत धृपतराव सावळे, सुबोध सावजी, चैनसुख संचेती या सारख्या ज्येष्ठ नेत्यांना आपली राजकीय पकड मजबूत करण्यासाठी याच तरूण नेत्यांशी संघर्ष करावा लागणार आहे. धृपतरावांनी मुकूल वासनिक यांची भेट घेतली तेव्हा, वासनिकांनी त्यांना काय शब्द दिला हे माहिती नसले तरी, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये परतलेल्या धृपतरावांच्या मनात पुन्हा आमदारकी लढण्याची आस असणे सहाजिक आहे. त्यासाठी त्यांना चिखली वगळता दुसरा मतदारसंघ नाही. तर या मतदारसंघातून इच्छूक असलेले राहुल बोंद्रे यांचे तिकीट कापून पक्ष धृपतरावांना उमेदवारी देणार का? हादेखील मोठाच प्रश्न आहे. मागील निवडणुकीत भाजपच्या उंबरठ्यावर आहे, असे संकेत राहुल बोंद्रे यांनी दिले होते, तसेच नाना पटोले यांच्याशीही त्यांचे बिनसल्याचे चित्र होते. त्यातच त्यावेळी वंचित बहुजन आघाडीची मतदारसंघात लाटही होती. या सर्वांचा परिणाम म्हणा की काही, राहुल बोंद्रे यांचा निसटता पराभव झाला होता. आता चिखलीत राहुल बोंद्रे किंवा धृपतराव सावळे यापैकी कुणीही उमेदवार दिला तरी, त्यांना विद्यमान आमदार श्वेता महाले यांचा पराभव करणे कठीण आहे. या मतदारसंघात महाले यांनी केलेली विकासकामे, आणि शहरातून भरभक्कम असलेला त्यांचा मतदार या त्यांच्या जमेच्या बाजू पाहाता, आणि तालुक्यातील त्यांच्या सोयरे-धायरे यांचे राजकीय वलय पाहाता, त्यांना यावेळेस मोठ्या मताधिक्क्याने विधानसभेत जाण्याची संधी आहे.


धृपतराव सावळे यांना मानणारा वर्ग चिखली व बुलढाणा तालुक्यांत आहे. त्यातील महाआघाडीत बुलढाणा हा शिवसेनेकडे आहे, तर चिखली काँग्रेसकडे. चिखलीचा निकाल तर आजच लागल्यात जमा आहे. बुलढाण्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर हे ‘मशाल’ हातात घेण्याची दाट शक्यता असून, लोकसभेच्या निवडणुकीत तुपकर यांना प्रतिकूल परिस्थितीतही या मतदारसंघातून लीड घेतला होता. तसेच, हा मतदारसंघ हा शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा असून, शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड व शिवसेना (ठाकरे) पक्षाचे संभाव्य उमेदवार रविकांत तुपकर यांच्यात सरळ सरळ लढत झाली तर तुपकर हे एकहाती विजय प्राप्त करतील, अशी संभावना या मतदारसंघात आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये घरवापसी झालेल्या धृपतराव सावळे यांनी निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या या पक्षांतरामुळे त्यांनीच काय साध्य केले? असा प्रश्न राजकीय वर्तुळातील चर्चेचा मुद्दा बनलेला आहे.
————–

भाजप नेते, माजी आ. धृपतराव सावळे यांना घरवासीचे वेध?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!