Head linesMEHAKARVidharbha

ज्यांनी ३० वर्षे आमदारकी भूषवली, त्यांनीच मेहकर मतदारसंघाचे वाटोळे केले!

- डॉ. ऋतुजा चव्हाण यांना घणाघाती आरोप; मतदारसंघ ३० वर्षात पुढे नाही तर ५० वर्षे मागे गेला!

– मेहकर – लोणार तालुक्यांचा विकास पाहिजे असेल तर एकदा संधी द्या; मतदारांना आवाहन

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – गेली ३० वर्षे मेहकर मतदारसंघाची आमदारकी भूषविल्यांनी या मतदारसंघात काय विकासाचे दिवे लावलेत? ते सांगावे. या मतदारसंघात शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार यांचे प्रश्न गंभीर आहे. मतदारसंघात एमआयडीसी आणता आली नाही. रस्ते, वीज, पाणी यांच्यासह सरकारी दवाखाने यांचे प्रश्न सोडविता आले नाही. आजपर्यंत आमदारकी भूषविणार्‍यांनी केलेले एक मोठे काम सांगावे, असे जाहीर आव्हान शेतकरी नेत्या तथा मेहकर-लोणार विधानसभा निवडणुकीतील उमेदवार डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी विरोधकांना दिले. मतदारसंघाचा विकास हवा असेल तर एकदा मला संधी द्या, असे आवाहन त्यांनी मतदारांना करून, जनतेची इच्छा असल्यानेच आपण निवडणुकीच्या मैदानात उतरलो असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी संवाद साधताना डॉ. ऋतुजा चव्हाण म्हणाल्या, की मेहकर व लोणार तालुक्यात रोजगाराच्या काहीच संधी नाहीत. त्यामुळे मेहकरच्या तरूणांना उद्योगधंद्यांसाठी पुण्या-मुंबईला जावे लागते. वारंवार आमदारकी भोगणार्‍या या नेत्यांना साधी एक एमआयडीसी पण मेहकरात आणता आली नाही. आमदारकी मिळाली, राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला तेव्हा केवळ खुर्चा उबवण्याचे काम त्यांनी केले. आजपर्यंतच्या आमदारांनी गेल्या ३० वर्षांत मतदारसंघाला पुढे आणण्याऐवजी ५० वर्षे मागे नेण्याचे पाप केले. त्यामुळे सामान्य जनतेचा तळतळाट त्यांना लागला आहे. या मतदारसंघातील दादागिरी, गुंडगिरी, शिवराळ व धमकीच्या भाषा या सूड आता सर्वसामान्य मतदारच उगविणार असून, ही मायबाप जनता मला मोठ्या फरकाने विधानसभेत पाठवणार आहे. या निवडणुकीत संधी मिळाल्यास ५० वर्षे मागे गेलेल्या मेहकर विधानसभा मतदारसंघाला पुढे आणण्यासाठी जीवाचे रान करीन, असा शब्द मी मायबाप जनतेला देते, असेही ऋतुजा चव्हाण यांनी सांगितले.

जनतेच्या आग्रहास्तव आपण विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. सिंचन, आरोग्य, शिक्षण, दळणवळण, उद्योग या सर्वच क्षेत्रात मेहकर विधानसभा मतदारसंघाची स्थिती चांगली नाही. सत्ताधार्‍यांनी स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबाचा विकास करून घेतला. मात्र जनतेला वार्‍यावर सोडले. त्यामुळेच आता मतदारसंघातील जनतेने परिवर्तनाचा निर्धार केला आहे. गावोगावी आम्ही जातो तेव्हा, जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. लोक बोलतात, व्यक्त होतात.. त्यांना आता पुन्हा तेच ते निष्क्रिय व कंटाळवाणे चेहरे नको आहे.
– डॉ. ऋतुजा ऋषांक चव्हाण
———–


मेहकर विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत एकदाही महिला उमेदवाराने प्रतिनिधित्व केले नाही. आधीची १५ वर्षे प्रतापराव जाधव आणि अलीकडची १५ वर्षे आ. रायमुलकर यांच्या रूपाने गत ३० वर्षांपासून सत्ता एकाच गटाकडे आहे. त्यामुळे मतदारसंघात प्रस्थापित विरोधी लाट आहे. महाविकास आघाडीकडून मतदारसंघ शिवसेना (ठाकरे) पक्षालाच सुटणार आहे. परंतु, त्यांच्याकडे स्थानिक व प्रस्थापितांना टक्कर देऊ शकेल, असा उमेदवार नाही. बाहेरचा उमेदवार या लोकांच्या विरोधात टिकणार नाही, उलट त्यांना फायदाच होईल. ज्या उमेदवारांची चर्चा आहे ते मतदारसंघातील नसल्याने शिवसेनेचा एक गट नाराज आहे. त्यामुळे मेहकर मतदारसंघात ये रे माझ्या मागल्या.. असे होऊ द्यायचे नसेल, व मतदारसंघाचा विकास हवा असेल तर मायबाप जनतेने, तरूणवर्गाने व महिला माता-भगिनींनी डोळसपणे मतदान करून मला संधी द्यावी, असे आवाहनही डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!