भाजप नेते, माजी आ. धृपतराव सावळे यांना घरवासीचे वेध?
- दिल्लीत घेतली खा. मुकुल वासनिकांची भेट, वाढदिवसाच्या शुभेच्छा आडून बरंच काही!
बुलढाणा/नवी दिल्ली (बाळू वानखेडे) – बुलढाण्याचे माजी आमदार, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे यांनी काल, दि. २७ सप्टेंबररोजी दिल्ली येथे अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव खा.मुकुल वासनिक यांची भेट घेऊन वाढदिवसानिमित्त त्यांचे अभीष्टचिंतन केले. वाढदिवसाचे निमित्त करत त्यांनी खा. मुकुल वासनिकांसोबत घरवापसीबाबत चर्चा केल्याची विश्वासनीय सूत्रांची माहिती आहे.
धृपदराव सावळे हे तसे राजकारणातील वादळी व्यक्तिमत्व. त्यांचे राजकारण भल्याभल्यांना गजकर्ण लावणारे ठरल्याचेही सांगितले जाते. बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तसेच जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपदसुद्धा त्यांनी काहीकाळ भूषवले आहे. २००४ मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवर बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. यादरम्यान ते एस.टी.महामंडळाचे उपाध्यक्षदेखील राहिले. २००९ मध्ये त्यांना थांबवून मुखत्यारसिंग राजपूत या ज्येष्ठ नेत्याला काँग्रेसने उमेदवारी दिली. अर्थात त्यांच्या उमेदवारीसाठी त्यावेळी मुकुल वासनिकांनीदेखील चांगलाच जोर लावला होता, असे सांगितले जाते. अन् येथेच माशी शिंकल्याचे बोलले जात असून, राजकारणात गेमचेंजर असलेल्या ध्रुपतरावांनी त्यावेळी मग मुखत्यारसिंग राजपूत यांचाच ‘गेम’ केल्याची चर्चा आजही होते आहे. मुखत्यारसिंग राजपूत यांचा निसटता पराभव झाला अशीदेखील त्यावेळी जोरदार चर्चा होती. दरम्यान, काहीकाळ अज्ञातवासात राहिल्यानंतर धृपदराव सावळे यांनी भाजपात प्रवेश केला व भाजपाचे जिल्ह्याचे अध्यक्षदेखील झाले. दरम्यान, पक्षाच्या फोडाफोडीनंतर पुन्हा ते साईडलाईन पडल्यासारखे दिसत असून, यादरम्यान त्यांचा काहीकाळ आजारपणातही गेला. ‘गड्या आपला गावच बरा’ या दृष्टीने आता धृपदराव सावळे यांना घर वापसीचे म्हणजे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे वेध लागले की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगू लागली आहे. या दरम्यान त्यांनी काल दि. २७ सप्टेंबररोजी काँग्रेसचे देश पातळीवरील नेते व बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. मुकुल वासनिक यांची दिल्लीस्थित निवासस्थानी भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राजकीय गप्पाही मारल्या. यामुळे त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेला आणखी रंग चढला आहे.