– नराधम आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी
चिखली (महेंद्र हिवाळे) – भंडार्याच्या कार्यक्रमातून नराधम आरोपी मुन्ना शहा मुबारक शहा याने अवघ्या १२ वर्षाच्या मुलीला मोटारसायकलवरून पळवून नेले होते. आरोपीने थेट पश्चिम बंगाल गाठले. या मुलीला नरकात ढकलण्यापूर्वीच चिखली पोलिसांनी मोठ्या शिताफीने व तांत्रिक तपासाच्या सहाय्याने आरोपीचा शोध लावून, पश्चिम बंगालमध्ये जाऊन या मुलीची सुटका केली, तसेच या नराधम आरोपीला जेरबंद केले. या मुलीवर अत्याचार झाला असावा, असाही संशय आहे. आरोपी व पीडित मुलगी वेगवेगळ्या समाजाची असल्याने जातीय तणाव निर्माण होण्याची भीती होती. परंतु, चिखली पोलिसांनी मोठ्या शिताफीने मोठी दुर्घटना टाळली आहे.
सविस्तर असे, की दिनांक १६ सप्टेंबररोजी पोलिस स्टेशन चिखली येथे फिर्यादीने माहिती दिली की, त्यांची १२ वर्षीय नातेवाईक पीडित मुलगी रेस्ट हाऊसच्या पाठीमागे भंडार्याच्या कार्यक्रमात हजर होती. परंतु काही वेळानंतर ती सदर कार्यक्रमात न दिसल्याने तिचा शोध घेतला असता, ती मिळून आली नाही. या मुलीला संशयित मुन्ना शहा मुबारक शहा याने फूस लावून तिला त्याच्या मोटारसायकलवर पळवून नेले असावे. सदर फिर्यादीने दिलेल्या माहितीची दखल घेऊन तात्काळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून, तपास सुरू केला. या घटनेतील पीडित मुलगी व आरोपी हे विभिन्न समाजातील असल्याने मोठा जातीय तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थीती निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी सदर गुन्ह्याच्या तपासासाठी वेगवेगळे तीन पथके तयार करून त्यांना गुन्ह्यातील पीडित व संशयित आरोपीचा शोध घेण्याच्या दृष्टीने योग्य त्या सूचना दिल्या. या पथकांनी गोपनीय व तांत्रिक तपास करुन आरोपी व पीडिता ही पश्चिम बंगाल राज्यात असल्याची माहिती मिळवली. त्यावरून पोलिस उपनिरीक्षक नितीनसिंह चौहान पोलिस नाईक अमोल गवई, महिला पोलिस कॉन्स्टेबल रूपाली उगले यांचे पथक पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या परवानगीने पश्चिम बंगाल राज्यात रवाना झाले. पश्चिम बंगाल राज्यात सदर आरोपीचा निश्चीत पत्ता नसतांना नमूद पथकाने तीन दिवस शोध घेऊन आरोपी मुन्ना शहा मुबारक शहा याचा शोध लावला व त्याच्या ताब्यातून पीडित अल्पवयीन मुलीची सुटका केली. या आरोपीस चौकशीकामी ताब्यात घेऊन दिनांक २७ सप्टेंबररोजी पोलीस स्टेशनला हजर केले. सदर आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता पीडितेस फूस लावून पळवून नेल्याची कबुली त्याने दिली आहे. गुन्ह्याच्या पुढील तपासाच्या अनुषंगाने आरोपीची पोलिस कोठडी आवश्यक असल्याने शनिवारी (दि.२८) न्यायालयापुढे हजर केले असता, न्यायालयाने दिनांक ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे. सदर प्रकरणी पोलीसांनी तात्काळ दखल घेतल्याने व आरोपी तसेच पीडित मुलगी हिस ताब्यात घेतल्याने मोठा जातीय तणाव निर्माण होण्यास प्रतिबंध झाला आहे. पोलीसांनी केलेल्या कार्यवाहीमुळे विविध स्तरातून नागरिक कौतुक करीत आहेत.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुणी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या नेतृत्त्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल तायडे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक नितीनसिंह चौहान, पोलिस नाईक अमोल गवई, महिला पोलिस कॉन्स्टेबल रूपाली उगले, राहुल पायघन, पंढरीनाथ मिसाळ, रोहीदास पंढरे, प्रशांत धंदर, सागर कोल्हे, नीलेश सावळे व सूर्यकला म्हस्के, सुनील येवले यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शरद भागवतकर, पोकॉ विनोद ब्राम्हणे हे करीत आहेत.