मोहन भागवतांना अजितदादांचे चोख प्रत्युत्तर; शिवरायांची समाधी महात्मा फुलेंनीच शोधली!
- शिवरायांची समाधी शोधण्याचे श्रेय टिळकांना देणारे सरसंघचालक मोहन भागवत तोंडघशी!
नाशिक (जिल्हा प्रतिनिधी) – महात्मा फुले यांनी पुणे ते रायगड पायी चालत जाऊन पाला-पाचोळ्यात असलेली शिवरायांची समाधी शोधून काढली, हे मी मनाचे सांगत नाही याचे कागदपत्रे आहेत. त्यांनी समाधीची साफसफाई करून फुले वाहिली, हे सगळे कागदपत्रांमध्ये आहे. त्यावरूनच मी बोलतोय. पुढे महात्मा फुले यांनीच पुण्यात शिवछत्रपतींचा सोहळा सुरू केला, अशा शब्दांत चोख प्रत्युत्तर देत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी चांगलेच तोंडघशी पाडले. डॉ. भागवत यांनी शिवरांची समाधी लोकमान्य टिळक यांनी शोधून काढल्याचा जावाई शोध लावला होता. फुलेंऐवजी भागवतांनी शिवरायांच्या समाधी शोधाचे श्रेय टिळकांना देण्याचा उपदव्याप केल्याने बहुजन समाजातून तीव्र आणि संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना, अजितदादांनी भागवतांना चोख प्रत्युत्तर दिल्याने बहुजन समाजाने समाधान व्यक्त केले आहे.
नाशिक येथे मुंबई चौक, सावित्रीबाई फुले चौकात क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योत सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे लोकार्पण सोहळा पार पडला. या प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांच्या वक्तव्याला खोडून काढले. महात्मा फुले यांनीच पुणे ते रायगड पायी चालत जाऊन पाला-पाचोळ्यात असलेली शिवरायांची समाधी शोधून काढली, असे अजित पवारांनी पुराव्यानिशी ठासून सांगितले. अजितदादा म्हणाले, की महात्मा फुले यांनी पुणे ते रायगड पायी चालत जाऊन पाला-पाचोळ्यात असलेली शिवरायांची समाधी शोधून काढली, हे मी मनाचे सांगत नाही याचे कागदपत्रे आहेत. त्यांनी समाधीची साफसफाई करून फुले वाहिली, हे सगळे कागदपत्रांमध्ये आहे. त्यावरूनच मी बोलतोय. पुढे महात्मा फुले यांनी पुण्यात शिवछत्रपतींचा सोहळा सुरू केला. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावे, अशी जनभावना आहेत. नरेंद्र मोदी तिसर्यांदा पंतप्रधान झाले आहे. त्यांच्याकडे मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री यासंबंधीची मागणी करणार असल्याचे अजित पवारांनी यावेळी सांगितले. एवढा मोठा अर्धाकृती पुतळा मी महाराष्ट्रात नाही पाहिला. या स्मारकामुळे नाशिकच्या लौकिकात भर पडली आहे. शिवछत्रपती-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांनी आपण राज्य चालवतो. महापुरुषांचे विचार घेऊनच राज्यात निर्णय घेतले जातात, असेही अजित पवार म्हणाले.
पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, इंग्रजांच्याविरुद्ध लढतानासुद्धा शिवाजी महाराज इथेच येऊन गेले. इथेसुद्धा त्यांचे स्मरण व्हावे म्हणून जागरण केले. रायगडावर उत्सव सुरू केला. लोकमान्य टिळकांनी रायगडावरील समाधी शोधून काढली. रवींद्रनाथ टागोर यांनीदेखील शिवाजी महाराजांवर कविता लिहिल्या आहेत. भागवतांनी शिवरायांच्या समाधी शोधाबद्दल धांदत खोटे वक्तव्य केल्याने तमाम बहुजन समाजात तीव्र आणि संतप्त भावना उमट होत्या.
“महात्मा फुले ब्राह्मण विरोधक नव्हते ब्राह्मण्यवादाचे विरोधक होते. ब्राह्मणपेक्षा आपल्या लोकांनी त्यांना जास्त विरोध केला. फुलेंनी पहिली शाळा भिडे वाड्यात सुरू केली, भिडे कोण ब्राह्मण.. त्यांना आपल्या लोकांनी कर्मठ लोकासोबत विरोध केला. दुसरी शाळा चिपळूणकर यांच्या वाड्यात सुरू केली, तेही ब्राह्मण होते”, असं मत राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्री फुले स्मारक लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.