Breaking newsHead linesMaharashtraMarathwadaMumbaiNagpurPolitical NewsPoliticsVidharbha

राज्यात आज राजकीय ‘शिमगा’?

- दसरा मेळाव्यांतून विचारांचे सोने 'लुटणार' की 'सीमोल्लंघन' होणार?

– दीक्षाभूमीवर होणार मात्र बाबासाहेबांच्या विचारांची मुक्त ‘उधळण’!

बुलढाणा/मुंबई (बाळू वानखेडे) – राज्यात आज, दि. १२ ऑक्टोबररोजी दसरा अर्थात विजयादशमीनिमित्त विविध पक्षातील मोठ्या नेत्यांच्या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून सभा होणार आहेत. या मेळाव्याच्या आडून चांगलाच राजकीय ‘शिमगा’ रंगणार असल्याचे दिसत असून, पवित्र दसर्‍याच्या दिवशी या निमित्ताने विचाराचे सोने लुटले जाणार की, शिमोल्लंघन होणार? याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. एकीकडे, उद्याच्या दसरा मेळाव्यातून राजकीय आगपाखड होणार असताना, दुसरीकडे नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर मात्र धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची मुक्त ‘उधळण’ होणार आहे.

राज्यात दरवर्षी मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळावा, नागपुरातील रेशीम बागेत संघाचा विजयादशमी उत्सव व येथीलच पवित्र दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रम नित्यनियमाने आयोजित केला जात असतात. यावर्षी मात्र आगामी विधानसभा निवडणुका म्हणा की आणखी काही? यामुळे विविध राजकीय पक्ष व सामाजिक नेत्यांचे दि. १२ ऑक्टोबर, दसरा अर्थात विजयादशमीनिमित्त दसरा मेळावे पार पडणार आहेत. यामध्ये दरवर्षीप्रमाणे नागपुरातील रेशीम बागेत संघाचा विजयादशमी उत्सव पार पडणार असून, यावेळी सरसंघचालक मोहन भागवत मार्गदर्शन करणार आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा दरवर्षी प्रमाणे होणार असून, आझाद मैदानावर शिवसेना शिंदे गटाचा तिसर्‍यांदा दसरा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकावर चांगलेच ‘बाण’ सोडणार आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरेसुद्धा उद्या राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. बीड जिल्ह्यातील भगवान भक्ती गडावर भाजपा नेत्या आ. पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडणार असून, यावर्षी मंत्री धनंजय मुंडे हेसुद्धा या मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. या मेळाव्यातून ओबीसींचे शक्ती प्रदर्शनच करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, याच जिल्ह्यात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनीसुद्धा नारायणगडावर प्रथमच दसरा मेळावा आयोजित केला असून, मराठा समाज बांधवांना हजर राहण्याचे आवाहन केले आहे. जवळजवळ ९०० एकरात हा मेळावा पार पडणार असल्याचे सांगण्यात येते. यावेळी मनोज जरांगे नेमकी काय भूमिका मांडतात, याकडे राज्याचे तसेच राजकीय धुरिणांचे लक्ष लागून आहे. एकीकडे, राज्यात राजकीय शिमगा रंगणार असताना दुसरीकडे नागपुरातील पवित्र दीक्षाभूमीवर मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची मुक्त ‘उधळण’ होणार आहे.


एकंदरीत आगामी विधानसभा निवडणूक पाहता, यावर्षी दसरा मेळाव्याच्या आडून नेते राजकीय ‘बाण’ चालवणार असून, चांगलीच राजकीय धुमश्चक्री उडण्याची शक्यता आहे. या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून एक प्रकारे शक्तिप्रदर्शनदेखील करण्यात येणार असून, यानिमित्ताने नेते विधानसभेचा बिगुल फुंकणार असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!