BULDHANAHead linesPolitical NewsPoliticsSINDKHEDRAJAVidharbha

माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या पक्षांतर भूमिकेमुळे अनेक नेते ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत!

- माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर, तोताराम कायंदेदेखील विधानसभेच्या मैदानात उतरण्यास तयार!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात दिवसेंदिवस अनेक घडामोडी होत असून, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या भूमिकेमुळे अनेक नेते ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत. तर दुसरीकडे, कु. गायत्री शिंगणे या तुतारीचा रथ सजवून गावोगावी मीच उमेदवार असल्याचे सांगून, मतदारांच्या भेटीगाठीचा सपाटा त्यांनी लावला आहे. तर डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर शिंदे गटाकडून माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर आणि भाजपकडून तोताराम कायंदे, विनोद वाघ, आणि डॉ. सुनील कायंदे यांच्याकडून प्रबळ दावेदारी सांगितली जात आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सात मतदारसंघापैकी सहा मतदार संघात महायुतीचे उमेदवार कोण असतील, हे जवळजवळ ठरले आहे. परंतु, सिंदखेडराजा मतदारसंघात नेमका महायुतीचा उमेदवार कोण, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी महायुतीचा उमेदवार म्हणून शिंदे गटाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, योगेश जाधव, हा मतदारसंघ भाजपाला सुटला तर डॉ. सुनील कायंदे, भाजपाचे पक्ष प्रवक्ते विनोद वाघ, माजी आमदार तोताराम कायंदे यांचे नाव चर्चेत आहे. माजी आमदार तोताराम कायंदे यांना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्याची ऑफर दिल्याचे समजते. त्यानुसार त्यांनी शरद पवारांची भेटसुध्दा घेतली होती. परंतु, डॉ.राजेंद्र शिंगणे हे परत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची बातमी मतदारसंघात येऊन धडकताच खळबळ उडाली आहे. विनोद वाघ हे तीनवेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांचे वैयक्तिक घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्यावर प्रदेश भाजपा पक्ष प्रवक्ते पदांची जबाबदारी टाकली आहे. युवकांचे नेते म्हणून ते काम पाहात आहेत. तर डॉ.सुनील कायंदे यांचे भाजप नेत्या पंकजाताई मुंढे यांचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जाते. पंकजाताई मुंढे यांचे आणि सुनील कायंदे यांचे घनिष्ठ संबंध आहे. तर तोताराम कायंदे हे मतदारसंघातील सर्व पक्षीय नेते आहेत. आजही त्यांचा घराघरात संबंध राहिला आहे. दोन वेळा आमदार राहून त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. एक शिक्षणमहर्षी म्हणून त्यांना ओळखले जाते. तर डॉ. शशिकांत खेडेकर मागील २०१४ ते २०१९ या पाच वर्षांत त्यांनी केलेल्या विकासकामांसाठी विकासपुरुष, जलसंधारणची कामे केल्याने जलपुरुष म्हणून ओळखले जाते. मागील पाच वर्षात आमदार नसताना त्यांनी अनेक विकासाची कामे सुरुच ठेवली. त्यामुळे या मतदारसंघात एक नव्हे तर दोन आमदार काम करताना दिसतात. ही या मतदारसंघासाठी जमेची बाजू आहे.
दुसरीकडे, सत्ता असताना या मतदारसंघात एकही नवीन मोठा प्रकल्प उभा राहिला नाही. जे बंद आहेत ते प्रकल्प सुरू झाले नाहीत. बंद पडलेली प्रकल्प सुरू करण्यासाठी आणि माझे आजोबा सहकार महर्षी स्व.भास्करराव शिंगणे यांच्या स्वप्नातील मतदारसंघ घडविण्यासाठी माझी मी निवडणूक लढणार आहे, अशी आक्रम भूमिका आता गायत्री शिंगणे यांनी घेतली आहे. डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी जर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी अनेकांना सांगितले आहे. गायत्री शिंगणे यांना थांबविले जाईल, त्यासाठी डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी त्यांचे राजकीय कॅरिअर घडविण्यासाठी शब्द द्यावा, असाही सूर उमटत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या सविता मुंढे यांचाही प्रचार आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सुरू झाला आहे. संभाव्य उमेदवार म्हणून नरेश बोडखे, सविता मुंढे, गायत्रीताई गणेश शिंगणे यांचे बॅनर गावागावात पाहायला मिळत आहेत.
दुसरीकडे, राजकीय पडद्यामागे अनेक हालचाली वेगात सुरु आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सर्वाधिक उमेदवार उमेदवारी मिळविण्यासाठी गर्दी आहे. तर अजित पवार गटाकडे एकानेही उमेदवार मिळावी म्हणून साधा अर्जही केला नसल्याचे समजते. जर डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला तर भाजपा या मतदारसंघात प्रबळ दावेदार म्हणून समोर येत आहे. शिंदे शिवसेना गटाकडून माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर हे एकमेव नाव आघाडीवर आहे. तर शिंदे यांच्या गटातील दुसरा उमेदवार ६ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्याकडे मुलाखतीसाठी गेल्याचे समजते. तो नेमका कोण, याची चर्चा मतदारसंघात सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!