परस्पर अंगठा टेकवून हडपली लाखोंची रक्कम!
- लघु पाटबंधारे विभाग जालना कार्यालयातील धक्कादायक प्रकार; पीडित विधवा महिलेची तक्रार दाखल
– सावरखेडा गोंधण येथील वायाळ कुटुंबाचा धक्कादायक प्रताप; शासनालाही लावला चुना?
जालना (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाला सावरखेड गोंधण, ता. जाफ्राबाद येथील कुशिवर्ता वायाळ, स्वाती वायाळ व विष्णू वायाळ या कुटुंबाने लाखो रूपयांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार दाखल झालेल्या तक्रारअर्जानंतर उघडकीस आला आहे. या कुटुंबाने सोनखेडा साठवण तलावात जमीन संपादनापोटी आलेल्या २५ टक्के रकमेतील श्रीमती अलका शालीकराम मिसाळ यांच्या हक्काची रक्कम परस्पर अंगठा टेकवून हडप केल्याची तक्रारच अलका मिसाळ यांनी कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग जालना यांच्याकडे केली आहे.
सविस्तर असे, की सोनखेडा साठवण तलावांतर्गत मौजे सावरखेडा गोंधण येथील गट नंबर ९४ मधील जमीन संपादीत करण्यात आलेली आहे. या जमिनीसाठी अलका शालीकराम मिसाळ या वारस आहेत. तसेच, कुशीवर्ता श्यामराव वायाळ, स्वाती वायाळ, विष्णू श्यामराव वायाळ हेदेखील वारस आहेत. या संपादनापोटी यापूर्वी मोबदला मिळाला होता. तर उर्वरित २५ टक्के मोबदला बाकी होता, तो आता शासनाने दिला आहे. हा उर्वरित मोबदला आला असता, यातील कुशीवर्ता वायाळ, स्वाती वायाळ, विष्णू वायाळ व साक्षीदार आत्माराम चिंचोले यांनी परस्पर संगनमताने श्रीमता अलका मिसाळ यांना कोणतीही कल्पना न देता, शपथपत्रावर परस्पर अंगठा टेकवून व खोटी स्वाक्षरी करून कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग जालना कार्यालयातून रकमेचा धनादेश काढून घेतला व शासनाचे पैसेदेखील काढून घेतले. या आरोपींनी केवळ अलका मिसाळ यांचीच नाही तर राज्य सरकारचीदेखील लाखो रूपयांनी फसवणूक केल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी माझा मोबदला मला द्यावा व आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अलका मिसाळ यांनी केली आहे.
फसवणुकीचा हा प्रकार गंभीर असून, पाटबंधारे विभाग संबंधित वायाळ कुटुंबावर फौजदारी कारवाई करून पीडित अलका मिसाळ यांचे पैसे त्यांना परत देते, की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच, या फसवणूक प्रकरणात या कार्यालयातील एका कर्मचार्याचाही हात असल्याची चर्चा सुरू असून, याबाबत पीडित मिसाळ यांच्यावतीने लवकरच वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रार दाखल केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एकीकडे, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे लाडकी बहीण योजना राबवत असताना, दुसरीकडे विधवा महिलेचीच फसवणूक होत असेल तर महिलांना लाडकी बहीण म्हणण्यात काय अर्थ आहे, अशी टीकाही सरकारविरूद्ध सुरू आहे.
———-