Breaking newsCrimeHead linesKhamgaonVidharbha

बाप बनला हैवान! दोन मुली नदीत फेकून दिल्या!

- दोघींचाही पाण्यात तडफडून मृत्यू; लाखनवाडा परिसरावर शोककळा

खामगाव (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील लाखनवाडानजीक असलेल्या लोणी कदमापूर येथील शेख हारून शेख शब्बीर या हैवान बापाने निदर्यीतेचा कळस गाठत, आपल्या सात व नऊ वर्षीय मुली अकोला जिल्ह्यातील भिकुंड नदीत फेकून दिल्या. काल दुपारी त्याने हे नृशंस कृत्य केले. या चिमुकल्यांचा पाण्यात तरफडून अत्यंत दुर्देवी मृत्यू झाला. रात्र झाली तरी मुली घरी न आल्याने हिवरखेड पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अकोला व बुलढाणा अशा दोन्हीही पोलिसांनी भिकुंड नदीपात्र काल रात्रीपासून शोध सुरू केला होता. अखेर रात्री दीड ते दोन वाजेदरम्यान दोन्ही बहिणींचे मृतदेह हाती लागले. घरगुती वादातून या हैवान बापाने हे कृत्य केल्याची चर्चा आहे.

सविस्तर असे, की लोणी कदमापूर येथे आधारकार्ड अपडेट करण्यासाठी दोघी बहिणी घरून निघाल्या होत्या. मात्र, बराच वेळ झाला, मुली घरी परतल्या नाही, त्यामुळे कुटुंबीयांनी मुली बेपत्ता असल्याची तक्रार हिवरखेड पोलिसांत दाखल केली होती. काल दुपारपासून या मुली सापडत नसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. खामगाव व हिवरखेड पोलिसांकडून या मुलींचा शोध सुरू होता. याच दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की या मुलीच्या वडिलांनीच मुलींना भिकुंड नदीत फेकून दिले. त्यानंतर वेगवान चक्रे फिरून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ग्रामीण, हिवरखेड आणि अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलिसांनी खाकीतील ‘माणुसकी’ दर्शन घडवत नदीपात्रात मुलींचा शोध सुरू केला. अखेर शनिवारी, दि. ५ ऑक्टोबरच्या रात्री दीड ते दोन वाजेदरम्यान दोन्ही बहिणींचे मृतदेह हाती लागले. प्रकरणी पित्यास खामगाव ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून, घरगुती वादातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक चौकशीत उघडकीस आले आहे. या हैवानाने आपल्या मुलींची क्रूरहत्या करण्यासाठी त्यांना अटाळी (तालुका खामगाव)मधून बाळापूरकडे नेले होते. यामुळे तपास खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
———–
लोणी कदमापूर येथील आरोपी पित्याचे नाव शेख हारून शेख शब्बीर असे आहे. निर्दयी बापानेच सात वर्षीय कुमारी सदफ व नऊ वर्षीय कुमारी आलिया या दोघा चिमुकल्या बहिणींना बाळापूरनजीकच्या नदीत फेकले. बाळापूर ते अकोला या राष्ट्रीय महामार्गावरील विटांच्या भट्ट्या असलेल्या परिसरात हे कृत्य केले. आरोपी बाप अटकेत असून, पोलिस कसून तपास करत आहेत.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!