-वारंवार पत्रव्यवहार करूनही उपाययोजना नाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, आरोग्याचा प्रश्नही गंभीर
लोणार (वाजिद खान) : लोणार तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गांधारी येथील जनजीवन विस्कळीत झाले असून, त्याचा सर्वाधिक फटका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बसला आहे. शाळेच्या संपूर्ण आवारात तब्बल ३ ते ४ फूट पावसाचे पाणी साचले असून, दूषित पाणी वर्गखोल्यांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचल्याने शाळेला अक्षरशः तलावाचे स्वरूप आले आहे. विशेष म्हणजे, या समस्येबाबत शाळा व्यवस्थापन आणि ग्रामस्थांनी वारंवार स्थानिक प्रशासनाकडे लेखी निवेदने व पत्रव्यवहार करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप होत आहे.
शिक्षणात खंड पडू नये या उद्देशाने पालकांनी प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या मुलांना शाळेत पाठवले. मात्र, वर्गखोल्यांच्या प्रवेशद्वारापर्यंत पाणी आल्याने आणि विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने शाळा सुरू ठेवणे अशक्य झाले. परिणामी, विद्यार्थ्यांना आल्या पावली घरी परतावे लागले. त्यामुळे चिमुकल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शाळेच्या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून दूषित पाणी साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच डासांची संख्या वाढल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रोसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाल्याने पालकांमध्ये चिंता वाढली आहे. गावातील अपुरी जलनिस्सारण व्यवस्था आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती वारंवार निर्माण होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वेळोवेळी निवेदने देऊनही प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना न केल्याने संतप्त पालक व ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शाळेच्या परिसरातील पाण्याचा तातडीने निचरा करून जंतुनाशक फवारणी करण्यात यावी तसेच भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.