-IIHS, बेंगळुरू येथे पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ठरले प्रेरणादायी उदाहरण
बिबी (ऋषी दंदाले) : लोणार तालुक्यातील पिंप्री खंदारे येथील अक्षय पांडुरंग कांबळे यांनी जिद्द, मेहनत आणि गुणवत्तेच्या बळावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांची इंडियन इन्स्टिट्यूट फॉर ह्यूमन सेटलमेंट्स (IIHS), बेंगळुरू येथे ‘Human Development Policy and Practice’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली असून, शिक्षणासाठी त्यांना तब्बल १६ लाख रुपयांची शैक्षणिक शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.
सामान्य कुटुंबातील अक्षय यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कठोर परिश्रम, चिकाटी आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. त्यांच्या या यशामागे आई-वडिलांचे कष्ट, प्रोत्साहन आणि संस्कार यांच्यासह एकलव्य संस्थेचे राजू केंद्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणाची जाणीव निर्माण करून त्यांना प्रोत्साहित करण्याच्या कार्याचा हा अभिमानास्पद परिणाम मानला जात आहे. अक्षय यांचे हे यश केवळ वैयक्तिक नसून ग्रामीण भागातील, तांडे-वाड्यांवरील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. उच्च शिक्षणाची स्वप्ने पाहणाऱ्या युवक-युवतींसाठी त्यांच्या यशाने नवी दिशा निर्माण केली असून, शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडविण्याची प्रेरणा मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे. अक्षय यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देताना, “तुझ्या प्रतिभेचा सुगंध देशभर आणि जगभर दरवळो. समाजासाठी तुझे कार्य प्रेरणादायी ठरो आणि शिक्षणाच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवी आशा निर्माण होवो,” अशा शब्दांत त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.