-तालुक्यात सरासरी ९८.०१ मिमी पावसाची नोंद; सर्वाधिक १२५.५ मिमी पाऊस शेंदुर्जन मंडळात
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा परिसरासह सिंदखेडराजा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून, या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. अनेक दिवसांपासून कोरडे पडलेले ओढे आणि नाले खळाळून वाहू लागले असून, तलाव व धरणांच्या पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. तालुक्यात काल सरासरी ९८.०१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील शेतीला नवसंजीवनी मिळाली आहे. काल रात्री झालेल्या दमदार पावसानंतर साखरखेर्डा येथून वाहणारी भोगावती नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. तसेच सवडद येथील कोराडी नदीलाही पूर आल्याने कोराडी धरणातील पाणीसाठा सुमारे ७० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. परिसरातील लघु व पाझर तलावही भरले असून विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून सर्वच पिकांची वाढ समाधानकारक होत आहे. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यातील सातही महसूल मंडळांमध्ये चांगला पाऊस झाला असून, सर्वाधिक पाऊस शेंदुर्जन मंडळात १२५.५ मिमी नोंदविण्यात आला आहे. त्यानंतर साखरखेर्डा मंडळात ११८.०५ मिमी, मलकापूर पांग्रा मंडळात ९७.०८ मिमी, सिंदखेडराजा मंडळात ९१.०५ मिमी, दुसरबीड मंडळात ८९.०८ मिमी, सोनोशी मंडळात ८३ मिमी आणि किनगाव राजा मंडळात ७२.०३ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. साखरखेर्डा-मेरा बु. मार्गावरील शिंदी गावाजवळ रस्त्यावर मोठे झाड पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, प्रशासनाने तातडीने जेसीबीच्या साहाय्याने झाड हटवून वाहतूक पूर्ववत केली.