-कारगिलपासून ‘ऑपरेशन सिंदूर’पर्यंत देशसेवा; भव्य स्वागत सोहळ्यात सेवानिवृत्तीनंतरही राष्ट्रसेवेची ग्वाही
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : भारतीय सैन्य दलात तब्बल २८ वर्षे २३ दिवस देशसेवा बजावून ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झालेले रिसालदार मेजर लिंबाजी जाधव यांचे मायभूमीत आगमन होताच ग्रामस्थांनी भव्य स्वागत केले. यावेळी बोलताना, “भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झालो असलो तरी देशसेवा हेच माझे कर्तव्य राहील,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
श्री पलसिद्ध महास्वामी मठ येथे आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. १९९८ मध्ये भारतीय सैन्य दलात दाखल झालेल्या लिंबाजी जाधव यांनी पाकिस्तान, बांगलादेश, चीन आणि अफगाणिस्तान सीमावर्ती भागात विविध ठिकाणी सेवा बजावली. जून १९९९ मध्ये कारगिल युद्धाच्या काळात त्यांची पहिली नियुक्ती झाली. त्यानंतर १३ डिसेंबर २००१ रोजी भारतीय संसदेवरील दहशतवादी हल्ल्यानंतरच्या लष्करी कारवाईत त्यांनी सहभाग घेतला. २०१२ ते २०१४ या कालावधीत ४८ राष्ट्रीय रायफल्समध्ये राजौरी व मेंढर सेक्टरमध्ये सेवा बजावली. तसेच ६ मे २०२५ रोजी भारत सरकारच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेदरम्यान अमृतसर सीमेवर वरिष्ठ जेसीओ म्हणून बटालियन कंपनीचे नेतृत्व केले. सेवानिवृत्तीनंतर गावात आगमन होताच छत्रपती शिवाजी महाराज टी-पॉइंट येथे फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर सजविलेल्या जीपमधून सहकुटुंब गावातून मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, सरपंच ज्योती अमित जाधव, माजी सैनिक देवलाल कव्हळे, अर्जुन गवई, विजय पांचाळ, सुनील रिंढे, रमेश दंदाले, गजानन पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, अनिकेत सैनिक स्कूलचे विद्यार्थी, माजी सैनिक आणि शेकडो नागरिक उपस्थित होते. रिसालदार मेजर लिंबाजी जाधव यांचा जन्म अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण म. पू. मा. शाळा, साखरखेर्डा येथे, तर माध्यमिक शिक्षण जिजामाता विद्यालयात झाले. १९९५ ते १९९७ या कालावधीत त्यांनी बुलढाणा येथे मोटार मेकॅनिक म्हणूनही काम केले. त्यानंतर १९९८ मध्ये भारतीय सैन्यात भरती होऊन त्यांनी राष्ट्रसेवेला वाहून घेतले. कार्यक्रमात त्रिदल माजी सैनिक सेवा संघाचे अध्यक्ष जय सिताराम तसेच संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी त्यांच्या दीर्घ आणि गौरवशाली सैन्यसेवेचा गौरव करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.