पुणे (युनूस खतीब) – पुणे पोलिस दलात सहाय्यक पोलिस निरीक्षक असल्याचे सांगून कॉलेज विद्यार्थ्यास धमकी देऊन त्याला आर्थिकदृष्ट्या लुटणार्या भामट्याच्या गुन्हे शाखेच्या युनीट-३ पथकाने मोठ्या शिताफीने मुसक्या आवळल्या आहेत. या गुन्ह्यात त्याने वापरलेली महिलेची स्कुटीदेखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
विद्यार्थ्याला दमदाटी करून लुटल्याची तक्रार सिंहगड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हेही दाखल झाले होते. पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून फिर्यादीची फसवणूक केलेली आहे. सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट-३ यांना करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अनिता मोरे यांचे मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात येत होता. या युनीटमधील पोलीस अंमलदार पोलीस शिपाई ज्ञानेश्वर चित्ते यांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही. फुटेज पाहून त्यांचे विश्लेषण करुन फुटेजमध्ये आरोपीने टीव्हीएस ज्युपीटर गाडी ही एमएच १२ एनएस १८७१ ही काळ्या रंगाची वापरल्याचे दिसून आले होते. त्यानुसार, या गाडीचा नंबरप्राप्त झाल्याने सदर गाडी मालकाचा नाव, पत्ता प्राप्त करता सदरची गाडी ही भारती माने, रा. भवानी पार्क, बिल्डींग-मंदार सोसायटी, फ्लॅट नं-४. धनकवडी, शेवटचा बसस्टॉप, पुणे यांची असल्याचे स्पष्ट झाले. या माहिती प्रमाणे युनिट प्रभारी अधिकारी यांना आदेश देवून सदर इसमाचा शोध घेवून त्यास ताब्यात घेण्यास सांगण्यात आले. त्यानुसार, आज रोजी तपासी अधिकारी, तसेच पोलिस कर्मचारी गोणते, पवार, कळंबे, चित्ते, पडवाळ, कत्राळे, पाटील असे सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेल्या इसमाचा प्राप्त पत्त्यावर पोहोचले असता, धनकवडी शेवटचा बसस्टॉप येथून सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेल्या वर्णनाचा इसम काळ्या रंगाच्या टीव्हीएस ज्युपीटर गाडी वरून जात असताना दिसून आला. लागलीच त्याला पोलिसांनी गाडी आडवी लावून त्यास जागीच थांबवून पकडण्यात आले. त्यास त्यांचे नाव व पत्ता विचारता त्याने आपले नाव शुभम अशोक माने, वय-२२ वर्षे, धंदा नोकरी, रा. फ्लॅट नं-४, भवानी पार्क बिल्डींग, मंदार सोसायटी, सर्व्हे नं-१, शेवटचा बस स्टॉप, धनकवडी, पुणे व सध्या रा. सुंदर अपार्टमेन्ट, फ्लॅट नं-४१०, पारिजात बंगल्यासमोर, मागडेवाडी, कात्रज, पुणे असे असल्याचे सांगितले. या आरोपीकडून गुन्हा करताना वापरलेली टीव्हीएस ज्युपीटर गाडी एमएच १२ एनएस १८७१ ही पुरावेकामी जप्त करण्यात आली आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे पुणे शहर श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे- १. गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अनिता मोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष क्षीरसागर, पोलीस अमलदार रामदास गोणते, शरद वाकसे, सुजित पवार, संजीव कळते. सोनम नेवसे, ज्ञानेश्वर चित्ते, प्रताप पडवाळ, सतिश काळे, राकेश टेकावडे, साईनाथ पाटील, गणेश शिंदे यांनी यशस्वी केली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.
———————