आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने परंपरांचे पालन करीत ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी जयंतीचे विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात आयोजन करण्यात आले. या निमित्त श्रींचा गाभारा विविधरंगी आकर्षक फुलांचे सजावटीने सजविण्यात आल्याने श्रींचे वैभवी रूप खुलून दिसत राहिले. श्रींचे दर्शनास भाविकांची मोठी गर्दी होती.
आळंदी मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन शुक्रवार ( दि.१६) पासून सुरु करण्यात आले आहे. सांगता सोहळा १९ सप्टेंबर ला होणार आहे. मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.
पंचक्रोशीतील माऊली भक्त यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी हस्तलिखित केली आहे. ज्ञानेश्वरी हस्तलिखीत प्रत पारायण होत असून या भाविक भक्तांचा सन्मान हस्तलिखित प्रत पूजन सांगता दिनी केले जाणार आहे. १९ सप्टेंबर ला काल्याचे कीर्तन , महाप्रसाद, संत साहित्य भेट देण्यात येणार आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनात उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यास आळंदी देवस्थानने विशेष सहकार्य केले आहे. यासाठी राम जांभुळकर महाराज, पायगुडे महाराज आदींनी यासाठी परिश्रम घेत असल्याचे माऊली मंदिराचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले. विविध धार्मिक मठ, मंदिर, धर्मशाळा येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती धार्मिक , सामाजिक कार्यक्रमांचे माध्यमातून उत्साहात आयोजित करण्यात आली.