– खड्डा बुजवून, सांडव्यात गेलेला सोनेवाडी-पांग्री रस्ता खुला करून देण्याची मागणी
अंत्री कोळी, ता. चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखली तालुक्यातील सोनेवाडी येथील गट नं. १०,११ मधील पाझर तलावामधील भिंती शेजारी बेकायदेशीरपणे खोदलेला खड्डा बुजविण्यात यावा, तसेच सांडव्यात गेलेल्या सोनेवाडी ते पांग्री जाणारा रस्ता खुला करुन देण्यात यावा, या मागणीसाठी सोनेवाडी येथील शेतकरी व ग्रामस्थ यांनी पाझर तलावामध्ये जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे.
मौजे सोनेवाडी येथील गट नंबर १० व ११ मधील झालेल्या पाझर तलावामध्ये बेकायदेशीर अतिक्रमण करून खोदलेल्या खड्ड्यामुळे पाझर तलावाच्या भिंतीला तडा जाऊन तलाव फुटण्याची शक्यता नाकारता येत नसल्याबाबत अनेकवेळा लेखी विनंती अर्ज देऊनसुद्धा आजपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे गट नंबर १० व ११ मधील सर्व शेतकरी व धरणाखालील जमीन गेलेले सर्व शेतकरी यांनी सदर तलावामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नितीन राजपूत, सुधाकर तायडे यांचे नेतृत्वात १४ सप्टेंबरपासून जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. तसेच सदर पाझर तलावमध्ये सांडव्यामध्ये गेलेला सोनेवाडी ते पांग्री जाणारा पांधन रस्ता हा पूर्ववत करून देण्यात यावा, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.
या आंदोलनामध्ये नितीन राजपूत, सुधाकर तायडे (स्वाभिमानी शेतकरी संघटना), प्रकाश तायडे , सुधाकर शेळके, बबन काळे, सतिश काळे, शंकर काळे, भास्कर काळे, अशोक काळे, महादु गुंजकर, भगवत गुंजकर, जयश्री प्रकाश तायडे, कुशिवर्ताबाई शेळके, सविता बबन काळे, सुरेखा सुधाकर तायडे, जनाबाई काळे, मंगला अशोक काळे, मंगलाबाई भास्कर काळे, कमलबाई गुंजकर, भिकाबाई, मुनीर शेख, कस्तुराबाई जंजाळ यांच्यासह अनेक शेतकरी भगिनी, शेतकरी व ग्रामस्थ सहभागी झालेले आहेत.
———————