- हल्लेखोेरांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला करून काढला पळ!
चिखली (तालुका प्रतिनिधी) – चिखली विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार अॅड. शंकर चव्हाण यांच्यावर हल्लेखोरांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला करून त्यांना जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार काल रात्रीच्या सुमारास घडला. अगदी किरकोळ कारणावरून हा हल्ला झाल्याने या हल्ल्याच्या हेतूबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, तालुक्यात वेगवेगळ्या शंका व्यक्त केल्या जात आहेत. या हल्ल्यात अॅड. चव्हाण हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर शहरातील एका खासगी रूग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
अॅड. शंकर चव्हाण यांचा तालुक्यातील बहुजन समाजात दांडगा जनसंपर्क असून, त्यांच्या उमेदवारीने प्रस्थापित राजकीय नेत्यांना चांगलाच धक्का बसल्याचे बोलले जात आहे. तसेच, त्यांनी मतदारसंघात प्रचारात चांगली आघाडीदेखील घेतली होती. काल लक्ष्मीपूजनाच्या रात्री ते मेहकर फाटा येथील हॉटेलमध्ये लक्ष्मीपूजन आटोपून आपल्या काही सहकार्यांसह निवडणुकीचे नियोजन करत असताना, अचानक एका टोळक्याने त्यांच्या हाॅटेलसमोर धिंगाणा सुरू केला. त्यांना हटकले असता, या तरूणांच्या टोळक्याने एड. चव्हाण यांच्यासह त्यांच्या वडिलांवर लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढविला. चव्हाण यांना जीवे ठार मारण्याचाच या तरूणांच्या टोळक्याचा इरादा असावा, असा संशय आता बळावला आहे. दरम्यान, घटनास्थळी हल्लाकल्लोळ माजल्याने जमाव जमा झाल्याचे पाहून हल्लेखोर हे पळून गेले. या घटनेची माहिती कळताच चिखली पोलिस घटनास्थळी आले.
याबाबत चिखली पोलिस ठाण्यात शंकर शेषराव चव्हाण (वय ४०) रा. मेहकर फाटा यांच्या फिर्यादीवरून हर्षल ओमप्रकाश इंगळे, आकाश इंगळे, मनोज इंगळे, मयूर सुरडकर, रा. भानखेड यांच्याविरोधात गुन्हा र.नं. ८४७/२०२४ भारतीय न्यायसंहितेच्या कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२) (३), ३२४ (४), ३ (५) अनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत दाखल फिर्यादीमध्ये नमूद आहे, की दिनांक २ नोव्हेंबरच्या रात्री १.३० वाजता फिर्यादीचे वडील शेषराव चव्हाण हे यांनी नमूद आरोपींना हॉटेल समोर धिंगाणा करू नका, असे म्हटले असता, आरोपीतांनी फिर्यादीस काठी, लोखंडी रॉडने तसेच फिर्यादीचे वडील शेषराव चव्हाण व हॉटेलचे स्टाफला लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच हॉटेलमधील सामानाचे नुकसान करुन दमदाटी केल्याने फिर्यादीच्या जबाबावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलसमोर धामधूम करण्याच्या कारणावरून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनीदेखील कळवले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शरद भागवतकर हे करत आहेत.
या मारहाणीत अॅड. शंकर चव्हाण हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना पोलिसांनी शहरातील एका खासगी रूग्णालयात तातडीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने हलविले. तेथे आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून, डोक्याला बराच मार लागलेला आहे. याप्रकरणी चिखली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
या घटनेमुळे चिखली तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हा हल्ला चव्हाण यांच्या राजकीय विरोधकांनी त्यांना निवडणूक रिंगणातून हटविण्यासाठी तर घडवून आणला नाही ना? अशी शंका तालुक्यातील राजकीय वर्तुळात ऐकायला येत आहे. अॅड. चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे प्रस्थापित राजकीय पक्षाच्या नेत्याचे चांगलेच धाबे दणाणले दिसते आहे. त्यामुळे किरकोळ घटनेतून एवढा मोठा हल्ला घडवून आणला गेला असावा, अशा प्रकारच्या चर्चा व शंका तालुक्यातून ऐकायला येत आहेत. पोलिसांनी खोलात जाऊन या घटनेचा तपास करावा, अशी लोकांतून चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, एड. चव्हाण यांनी एक व्हिडिओ प्रसारित करत, आपल्यावरील हल्ला हा राजकीय द्वेषातून झालेला नाही, असे स्पष्ट केले आहे.
हल्ल्यामागे राहुल बोंद्रेंचा हात नाही, सोशल मीडियावर व्हायरल झालेली पोस्ट खोडसाळपणा – अॅड. चव्हाण
दरम्यान, अॅड. शंकर चव्हाण यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत, आपल्यावरील हल्ल्यासंदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेली पोस्ट हा खोडसाळपणा असून, यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले. आपल्यावरील हल्ल्यामागे राहुल बोंद्रे किंवा त्यांचे कार्यकर्ते नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.