दिवाळीच्या आनंदात सामाजिक भानाची ‘साखर’!
- तहसीलदार नीलेश मडके यांनी अनाथ मुलांसोबत साजरी केली दिवाळी
– नित्यानंद सेवा प्रकल्पातील निराधारांना दिला गोडधोडचा पाहुणचार; मुलांच्या चेहर्यावर फुलले ‘हास्य’!
मेहकर/बुलढाणा (बाळू वानखेडे) – दिवाळी तसा आनंदाचा उत्सव, हा दीपोत्सव कुटुंबात साजरा करण्याची मजा काही औरच, मात्र ज्याचे कुटुंबच नाही, अशा तालुक्यातील हिवरा आश्रम येथील नित्यानंद सेवा प्रकल्पातील अनाथ मुलांसोबत सामाजिक भानाची जाण ठेवत, मेहकरचे तहसीलदार नीलेश मडके यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी काल, दि. १ नोव्हेंबररोजी दिवाळी साजरी केली. यावेळी मातृहृदयी असलेले तहसीलदार मडके यांनी स्वतः अनाथ मुलांना जेवण वाढले, याकामी त्यांच्या सुविद्य पत्नी यांनीही हातभार लावला. औक्षण करत मुलांच्या पसंतीचे निष्ठांन्न खाऊ घातल्याने या मुलांच्या चेहर्यावर मात्र वेगळेच हास्य फुललेले दिसत होते.
समाजाचे काही देणे लागते, या भावनेतून अनाथांसोबत दिवाळी साजरी करणे हे माझे भाग्य समजतो, असे असे तहसीलदार नीलेश मडके यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.
दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. असे म्हणतात की, या दिवशी प्रभू श्रीराम १४ वर्षांचा वनवास संपवून परत आले होते, त्यामुळे त्यांच्या आगमनाचे दिवे लावून स्वागत करण्यात आले होते. त्याची आठवण म्हणून सदर दीपोत्सव साजरा करण्यात येतो. दिवाळी आनंदाचा दिवस असल्याने घरोघरी गोडधोड पदार्थ केल्या जातात. या दिवशी कुटुंबातील सदस्य कोठेही असले तरी, या निमित्ताने एका जागी येतात व सोबत दिवाळी साजरी करतात. परंतु ज्यांचे पालक नाहीत, अशा मुलांना अनाथ आश्रमात सर्व सोयीसुविधा असतानाही दिवाळीच्या दिवशी मात्र हुरहुर वाटणे स्वभाविक आहे. हेच हेरून व समाजाला काही देणे लागते, या उदात्त भावनेतून मेहकरचे तहसीलदार नीलेश मडके यांनी तालुक्यातील हिवरा आश्रम येथील रामकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट संचलित नित्यानंद सेवा प्रकल्पातील ४ ते १८ वयोगटातील ५० विद्यार्थ्यांना आपल्या शासकीय निवासस्थानी स्वतः आणून औक्षण करत, मिष्ठान्नांसह यथेच्च भरपेट जेवण दिले.
आमच्यासाठी आठवणीतील दिवाळी – निष्काम सेवाव्रती अनंत शेळके
हिवरा आश्रम येथील रामकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट संचलित नित्यानंद सेवा प्रकल्प हा लोकसभागातून चालवण्यात येतो. येथे चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोलासह ९ जिल्ह्यांतील अनाथ मुले राहतात. तहसीलदार नीलेश मडके यांनी अनाथ मुलांची केलेली दिवाळी ही आमच्यासाठी आठवणीतील दिवाळी राहील, असे या प्रकल्पाचे प्रकल्प संचालक सेवाव्रती अनंत शेळके यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.
विशेष म्हणजे, तहसीलदार नीलेश मडके हे दिव्यांग असतानाही व जवळ कर्मचार्यांचा लवाजमा असतानाही त्यांनी या मुलांना स्वतः बापाच्या मायेने जेवण वाढले. या कामी त्यांच्या सुवीद्य पत्नी यांचीदेखील मोलाची मदत झाली. विशेष म्हणजे, तहसीलदार नीलेश मडके यांनी एक दिवस अगोदर हिवरा आश्रम येथील नित्यानंद सेवा प्रकल्पात जाऊन अनाथ मुलांची भेट घेत, त्यांच्या आवडीचे मेन्यूदेखील विचारले होते. एक मोठा अधिकारी, पण कोणताही गाजावाजा न करता, सामाजिक बांधिलकी राखत अनाथांसोबत दिवाळी साजरी करतो, या उपक्रमाचे मात्र सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, नायब तहसीलदार अजय पिंपरकर, मंडळ अधिकारी बालाजी अनमोड, मंडळ अधिकारी ढोके, मंडळ अधिकारी महाजन, तलाठी निकस, तसेच तोडे, सोनोनेसह कर्मचारी हजर होते.
बसपाच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला; चिखली शहर हादरले!