– मेहकर मतदारसंघात परिवर्तनाची जोरदार लाट; तरूणाई म्हणतेय, ‘चेहरा नवा, बदल हवा’!
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – शेतकरी संघटना-क्रांतीकारीचे नेते तथा शेतकरी चळवळीतील अभ्यासू नेतृत्व डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यासह शेतकरी नेते ऋषांक चव्हाण यांच्या मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडी व क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या अधिकृत उमेदवार डॉ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित गावभेट दौर्यांना जोरदार प्रतिसाद लाभत आहे. ‘चेहरा नवा, बदल हवा’ अशी हाक तरूणाईने दिली असून, गावकुसातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी वर्गासह सर्व जाती-धर्माच्या नागरिकांनी यंदा मतदारसंघात परिवर्तन घडवून ऋतुजाताईंना मोठ्या मताधिक्क्याने विधानसभेत पाठवू, असा निर्धार व्यक्त केला आहे. डॉ. टाले व ऋषांक चव्हाण यांचे ठीकठिकाणी जोरदार स्वागत होत आहे.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते, डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी वंचित बहुजन आघाडी व क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या अधिकृत उमेदवार डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्या प्रचारार्थ मेहकर तालुक्यातील पोखरी, पेनटाकळी, कासारखेड, हिवरा आश्रम, लोणी, गजरखेड, वरदडा या गावांचा दौरा करून गावकर्यांशी संवाद साधला. शेतकरी-कष्टकर्यांच्या प्रश्नांवर आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत, अनेक आंदोलने केली, तुरुंगवास भोगला, पण या आंदोलनातून शेतकरी-कष्टकर्यांच्या पदरात ‘फुल ना फुलांची पाकळी’ पाडून देण्याचे काम केले आहे. त्यामुळे आमच्या या लढाईला तुम्ही साथ देणे गरजेचे आहे. त्यामुळे डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्या ‘गॅस सिलेंडर’ या निशाणीसमोरील बटन दाबून डॉ.ऋतुजा चव्हाण यांना विजयी करा, असे आवाहन डॉ.टाले यांनी गावकर्यांना केले. यावेळी गणेश गारोळे, ऋषांक चव्हाण, अनिल ठोंबरे, महेश देशमुख, प्रदीप खंडारे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
या शिवाय, डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी प्रचारार्थ लोणार तालुक्यातील पळसखेड येथेदेखील डॉ. टाले व ऋषांक चव्हाण यांनी जात गावकर्यांशी संवाद साधला. यावेळी तरूणांचा प्रचंड उत्साह बघायला मिळाला. आमच्या बहिणीला विजयी करण्यासाठी आम्ही ताकदीने काम करू, असा शब्द या तरूणांनी यावेळी दिला.
—————-