उद्धव ठाकरेंच्या सभांनी फुंकले जाणार बुलढाण्यातील जाहीर सभांचे रणशिंग!
- धोक्यात असलेल्या बुलढाणा व मेहकरांतील जागांसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच मैदानात!
– ८ नोव्हेंबररोजी जयश्री शेळकेंसाठी बुलढाण्यात तर सिद्धार्थ खरातांसाठी मेहकरात जाहीर सभा
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – महाआघाडीतील अंतर्गत कुरबुरी व बलाढ्य उमेदवारांसमोर त्या तुलनेत दिलेले कमजोर उमेदवार यामुळे जनमाणसाच्या नजरेतून धोक्यात दिसत असलेल्या बुलढाणा व मेहकरच्या जागांसाठी शिवसेना (युबीटी) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे स्वतः मैदानात उतरले असून, ८ नोव्हेंबररोजी ठाकरे हे बुलढाणा व मेहकर येथे जाहीर सभा घेणार आहेत. ८ तारखेला ठाकरेंची दुपारी तीन वाजता बुलढाण्यात तर सायंकाळी पाच वाजता मेहकरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभांची जोरदार तयारी शिवसेनेकडून सुरू आहे.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या उमेदवार जयश्री शेळके यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्यानंतर निष्ठावंत शिवसैनिक नाराज असल्याचे चित्र आहे. यापैकी काही निष्ठावंत शिवसैनिकांना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत हे उमेदवार हवे होते. दुसरीकडे, काँग्रेसचे नेते व कार्यकर्तेही नाराज आहेत. या नाराज कार्यकर्त्यांना माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना उमेदवारी हवी होती. त्यामुळे हे दोघेही मन लावून शेळके यांचा प्रचार करताना फारसे दिसत नाहीत. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यासमोर जोरदार आव्हान निर्माण करण्यात जयश्री शेळके या कमी पडल्याचे जाणवते आहे. त्याचा आ. गायकवाड यांना फायदाच होत आहे. शिवसेनेने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासारखा तगडा उमेदवार येथे दिला असता तर, मात्र आ. गायकवाड यांना तुल्यबळ लढत मिळाली असती, अशी जनमाणसातून चर्चा आहे. त्यामुळे शेळके यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची सभा काहीशी ऊर्जितावस्था निर्माण करणारी ठरू शकते. अशीच परिस्थिती मेहकर विधानसभा मतदारसंघातही आहे. शिवसेनेचे उमेदवार सिद्धार्थ खरात हे प्रचारात कमी पडत असल्याचे जाणवत असून, त्या तुलनेत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांनी शिंदे गटाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. खरात यांनाही महाआघाडीअंतर्गत कुरबुरीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यातच बुलढाणा व मेहकर मतदारसंघात काँग्रेसचे कार्यकर्ते मन लावून या उमेदवारांचे काम करतील की नाही, याबाबतही साशंकता निर्माण झालेली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ७ व ८ नोव्हेंबर असे दोन दिवस शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पश्चिम विदर्भ दौर्यावर येणार आहेत. बुलढाणा येथे ८ नोव्हेंबररोजी जयश्री शेळके यांच्या प्रचारार्थ दुपारी तीन वाजता, तर मेहकरचे उमेदवार सिध्दार्थ खरात यांच्या प्रचारार्थ सायंकाळी पाच वाजता सभा आयोजित केल्या आहेत. ८ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता बुलढाणा अर्बन रेसिडेन्सीसमोरील मोकळ्या मैदानात उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले असून, या सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी केलेले आहे.